वैनगंगा नदीचे पात्र कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:26 PM2018-04-15T22:26:40+5:302018-04-15T22:26:40+5:30
मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो. या नदी किनाऱ्यावर स्वतंत्र्य पाण्याची टाकी उभारल्या जात आहेत. या माध्यमातून ३१ गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा दुथडी भरून वाहू शकली नाही. सध्या या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी ग्रामीण पाणी पुरवठा प्रभावित होऊन जलसंकट निर्माण झाले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने पाट काढून पाण्याचा मार्ग टाकीपर्यंत काढला. मात्र तोही आटत आल्याने पाणी समस्या उग्ररूप धारण करणार असून हजारो कुटुंबीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे लाखो रूपये खर्च करून १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ, पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पंधरा वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
याच नदिपात्रातून मूल शहरालाही पाणी पुरवठा होतो. या योजनांच्या माध्यमातून ३१ गावांची तहान भागत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनांना पाणी कमी पडत असून महिलांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही आहे. परिणामत: पाणी समस्या गंभीर होत असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळ वैनगंगा नदीवर पाच वर्षापासून लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या खालील वैनगंगेचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे.
वैनगंगेच्या नदीपात्रावर जि.प.च्या जवळपास दहा ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यांना पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाणी समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे.
जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन खिळखिळी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावांकरिता असलेल्या योजनेची पाईप लाईन १५ वर्षे जुनी आहे. ही पाईपलाईन गंजून खिळखिळी झाली आहे. ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून हजारो लिटर पाणी बारमाही वाया जाते. ही बाब संबंधित कंत्राटदाराने प्रशासनाला वारंवार कळविली. मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
वैनगंगा नदीवर बंधाऱ्याचे काम झाल्याने नदी कोरडी होत आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील तिन्ही योजनांना पाणी कमी पडत आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून पाणी मे महिन्यापर्यंत केबसे पुरेल, यासाठी नियोजन केले जात आहे.
- कोटनाके, शाखा अभियंता
ग्रामीण पाणी पूरवठा, जि.प. चंद्रपूर