गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:30 PM2023-07-18T12:30:18+5:302023-07-18T12:31:27+5:30
पावसामुळे सर्वच नदी-नाल्यांच्या जलपातळीत वाढ
चंद्रपूर : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची झळ सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदी फुगली. बॅकवॉटर नाल्या काठावरील शेतात शिरल्याने काही गावांची पिके पाण्याखाली आली. पावसाचा जोर वाढल्यास मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अजूनही पावसाचा जोर नाही. मात्र, शनिवारपासून नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात पावसाने जोर पकडला. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. नागभीड तालुक्यातील बाह्मणी, बोथली, कोटगाव, पेंढरी, मांगली, देवपायली, बोंड, राजुली, बाळापूर, पारडी या गावांत शनिवारी पाणी शिरले. नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटेपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. चिमूर तालुक्यातील पांजरेपार गावही पाण्याखाली आले होते. संततधार पावसाने वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोसेखुर्दचे सर्व दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. पावसाचा जोर राहिला तर सर्वच नदी नाल्यांना पूर येऊ शकतो.
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ३७३४.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
महसूल पथकाकडून पाहणी
रविवारी चिमूर, नागभीड, सिंदेवाही तालुक्यांतील पुराने काही गावांचे नुकसान झाले. शंकरपूर-येथून जवळच असलेल्या पांजरेपार गावाला शनिवारच्या रात्री आलेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. २० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पांजरेपार हे सहाशे लोक वस्तीचे गाव असून गावाजवळूनच नाला वाहतो. शनिवारी रात्री नाल्याला पूर आला. सोमवारी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.
उमा नदीपुलावरून पाणी
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज-जुनगाव येथील नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. मात्र काही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्याने मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पथक दाखल होऊन या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज नागभीड तालुक्यात सर्वाधिक ४२. ६ मिमी तर जिल्ह्यात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली.
गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. घोडाझरी धरणाच्या केवळ सांडव्यातून पाणी सोडणे सुरू आहे.
- श्याम काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपूर