मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 01:11 AM2016-06-10T01:11:43+5:302016-06-10T01:11:43+5:30
गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले.
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान : खरिप हंगाम तोंडावर
ब्रह्मपुरी : गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही मतद तातडीने वाटप करण्याची मागणी आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगाव, वांद्रा, हळदा, कोसंबी ही गावे येतात. या गावालगतच जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे चितळ, हरिण, सांभर, रानडुकर या वन्यप्राण्यांचा नेहमीचा परिसरात वावर असतो. जंगलालगत शेतजमीन असल्याने वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. रबी हंगाम रानडुकरांचे कळप सर्व शेतच फक्त करतात. तसेच गावात शेतातील जनावरांवर हल्ले करून ठार करतात. अशा नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. नुकसान झालेल्या शेतीचे वनकर्मचाऱ्यांची पंचनामे केले होते. पंचनामे केल्यानंतर काही दिवसात मदत मिळेल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते.
मात्र चार- पाच महिने लोटूनही अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शासनाकडून निधी आला नसल्याची चर्चा सुरू असल्ी तरी खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. त्याच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. पैशाची आता गरज आहे. मात्र मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)