पोंभुर्णावासीयांना बसस्थानकाची प्रतीक्षा
By admin | Published: January 20, 2015 11:11 PM2015-01-20T23:11:13+5:302015-01-20T23:11:13+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त पोंभुर्णा तालुका मुख्यालयात बसस्थानकाअभावी प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पोंभुर्णा : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त पोंभुर्णा तालुका मुख्यालयात बसस्थानकाअभावी प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना उन्हात रस्त्यावर उभे राहून बसची वाट बघावी लागत आहे.
पोंभुर्णा तालुक्याच्या निर्मितीला १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र येथे अजूनपर्यंत सुसज्ज बसस्थानकाची निर्मिती झाली नाही. याठिकाणी मुख्य रस्त्यावर पंचायत समिती कार्यालयासमोर प्रवासी निवारा बांधण्यात आला. त्याला लागूनच ग्रामपंचायतीचे सार्वजनिक प्रसाधनगृह आहे. यातील घाणीचा निचरा होत नसल्याने त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा सामना करावा लागत आहे. काहींना तर साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याच प्रसाधनगृहाच्या बाजुला पंचायत समितीचे कार्यालय आहे.
तेथील कर्मचाऱ्यांनासुद्धा सदर दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पोंभुर्णा तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी ग्रामीण परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला कामानिमित्त येत असतात. त्यामुळे त्यांना प्रवासी निवाऱ्याजवळ तासन्तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा फटका शाळकरी विद्यार्थिनीना बसत आहे. येथील बसथांब्यालगत प्रसाधनगृहाची दुर्गंधी असल्याने प्रवासी जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीचा आश्रय घेतात.
अनेक प्रवासी या त्रासाला कंटाळून खासगी वाहनातून प्रवास करताना दिसतात. यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी एसटीचासुद्धा तोटा होतो. याठिकाणी सुसज्ज बसस्थानकाची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींना अनेकदा मागणी केली. पुढाऱ्यांनी आश्वासनेही दिले. मात्र याठिकाणी अद्यापही बसस्थानक झाले नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. बसस्थानक बांधकामाच्या दृष्टीने तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)