नागरिकांना मतदार यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 12:25 AM2017-03-02T00:25:16+5:302017-03-02T00:25:16+5:30

महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. आता मार्च महिन्याला सुरुवातही झाली आहे.

Waiting for citizens list of voters | नागरिकांना मतदार यादीची प्रतीक्षा

नागरिकांना मतदार यादीची प्रतीक्षा

Next

वेध मनपा निवडणुकीचे : मनपा प्रशासनाची कासवगतीने वाटचाल
चंद्रपूर : महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. आता मार्च महिन्याला सुरुवातही झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. असे असतानाही मनपा प्रशासनाची निवडणूकपूर्व प्रक्रिया मात्र अतिशय संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत अंतिम प्रभाग रचना पूर्ण झाली नसून नागरिकांसमोर मतदार यादीही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. नागरिकांना अद्याप मतदार यादीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
मागील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वादळ जिल्हाभर जोरात वाहत होते. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी २३ फेब्रुवारीच्या निकालानंतर थांबलीे. भाजपाने जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ तर पंचायत समितीच्या ११२ जागांपैकी ७१ एवढ्या जागांवर वर्चस्व सिध्द केले. मिनी मंत्रालयात भाजपाची सत्ता बसेल, हे निर्विवाद आहे. या निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांना चांगलाच हादरा बसला. आता चंद्रपूर महानगरपालिकेचीही निवडणूक तोंडावर आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या चुकांची मनपा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नव्याने व्युहरचना करण्यात व्यस्त झाले आहेत. प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फिरणे सुरू केले आहे. भल्या सकाळीच हे नगरसेवक आता वॉर्डात नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहे. एकूणच चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल, असा अंदाज आहे.
एकूणच मनपा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. असे असतानाही या निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया म्हणजे प्रभाग रचना करणे, त्यावर आक्षेप मागविणे, आक्षेपानंतर पुन्हा अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे, मतदार यादी अद्यावत करणे, ती नागरिकांसमोर उपलब्ध करणे, त्यावर आक्षेप आल्यास पुन्हा नव्याने मतदार यादी अद्यावत करून प्रसिध्द करणे यासारखी कामे करण्यास मनपा प्रशासनाकडून विलंब होत आहे. ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
२०११ च्या मतदार यादीत अनेक बदल झाले आहेत. अनेक नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली की नाही, हे बघण्याची उत्सुकता आहे. यादीत नावे नसतील वा वेगळ्याच प्रभागात नावे असतील तर त्यावर आक्षेप नोंदवावे लागतात. यात आणखी काही दिवसांचा कालावधी लागतो.
त्यामुळे ही मतदार यादी २७ फेब्रुवारीपर्यंतच नागरिकांसमोर ठेवण्यात येईल, असे संकेत मनपा प्रशासनाने दिले होते. मात्र आज १ मार्च रोजीही ही यादी नागरिकांसमोर प्रसिध्द करण्यात आलेली नाही. या संथगतीच्या कामामुळे पुढे अत्यंत ढिसाडघाईने कामे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी)

तीन प्रभाग रचनेत बदल
चंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले होते. या ३३ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. याप्रमाणे मतदारांनी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले. मात्र यावेळी यात बदल झाला आहे. २२ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी शासनाने पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. प्रभाग रचना व प्रभागातील आरक्षण डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले. त्यानंतर यावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. नगरसेवक संजय वैद्य, संदीप आवारी, नंदू नागरकर आदींनी प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविल्यानंतर हे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे सिव्हील लाईन, भिवापूर, शास्त्रीनगर या प्रभाग रचनेत बदल करण्यात आलेला आहे. मात्र हा बदल करून अंतिम प्रभाग रचनाही अद्याप प्रसिध्द करण्यात आलेली नाही.

Web Title: Waiting for citizens list of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.