विसापुरातील आयटीआयटला उद्घाटनाची प्रतीक्षा
By admin | Published: September 23, 2016 01:02 AM2016-09-23T01:02:53+5:302016-09-23T01:02:53+5:30
तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिवकुंड परिसरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
इमारतीचे बांधकाम पूर्ण : वीज जोडणीमुळे अडचण
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिवकुंड परिसरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. सहा महिन्यापासून अद्यावत इमारत येथे उभी आहे. मात्र वीज वितरण कंपनीमार्फत अद्याप वीज जोडणी करण्यात आली नाही. परिणामी कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
बल्लारपूर तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निर्मित करण्यात आल्यानंतर आजतागायत येथील प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्ता गोडावूनच्या इमारतीत धडे दिले जात आहे. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण घेता यावे म्हणून स्वत:ची इमारत विसापूर गावाच्या हद्दीत भिवकुंडमध्ये बांधण्यात आली. इमारतीचे बांधकाम होवून जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम न झाल्यामुळे इमारत अळगळीत पडली आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीला बांधकाम पूर्ण होताच वीज जोडणी करणे गरजेचे होते. मात्र अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्यापही वीज जोडणी करण्यात आलेली नाही. वीज वितरण कंपनीकडे केवळ प्रस्ताव सादर करण्यात आला असून आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात न अल्यामुळे वीज जोडणी करण्यात न आल्याची माहिती आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत बांधकामावर लाखो रुपयाचा खर्च करण्यात आला. परंतु, केवळ वीज जोडणी न केल्यामुळे आयटीआयचे उद्घाटन लांबणीवर पडले असून अद्यावत इमारतीत शिक्षण घेण्यापासून विद्यार्थी वंचित आहेत. (शहर प्रतिनिधी)