जिल्ह्यातील होमगार्ड वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:46 AM2019-04-08T00:46:24+5:302019-04-08T00:46:58+5:30
पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुवस्था सांभाळणाऱ्या होमगार्ड प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांच्या मदतीला जाण्यासाठी होमगार्ड सदैव तत्पर असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुवस्था सांभाळणाऱ्या होमगार्ड प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांच्या मदतीला जाण्यासाठी होमगार्ड सदैव तत्पर असतात. पोलिसांएवढीच महत्वाची जबाबदार ते बजावतात. मात्र, होमगार्ड जवानांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. विशेषत: वर्षभरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच होमगार्डची नियुक्ती केली जाते. त्यासाठी प्रति दिवसाचे ४०० रूपये मानधन दिले जाते. महागाईच्या काळात तटपुंजे मानधन मिळत असल्याने विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळेच दिवसाला ७५० रूपये मानधन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
नियमाप्रमाणे होमगार्डला वर्षभरात १८० दिवस काम देण्यात येईल. असे ठरले आहे. मात्र, उर्वरित दिवसात काम उपलब्ध न झाल्यास प्रपंच चालवावाया, तर कसा असा प्रश्न निर्माण होतो. होमागार्ड जवानांनी आम्हाला ३६५ दिवस कामावर ठेवण्याची मागणी केली आहे. ही मागणी अद्यापही शासन दरबारी पणर््ूा झालेली नाही. अत्यल्प मानधनात किती दिवस काम करावे, असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.
दुसरीकडे कामावरून कमी करण्यात आलेल्या जवानांनी अनेकदा आंदोलनेही केलीत. आंदोलनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत राज्य शासनाने ८ मार्च २०१९ ला शासन निर्णय काढला. यात शारीरिक पात्रतेच्या कठोर असलेल्या अटी शिथील करण्यात आल्या. तसेच वर्यामर्यादा ५५ वर्षावरून ५८ वर्ष करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. मात्र, यासंदर्भात विभागीय महासमादेशकांनी सदर शासन निर्णयावर प्रपत्र काढले नसल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चला लागू झाली. तत्पूर्वीच राज्यशासनाने शासनादेश काढला. मात्र,घोडे कुठे अडले कुणास ठाऊक. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विभागीय महासमादेशकांनीही प्रपत्र का काढले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. परिणामी होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
अंमलबजावणी करा
मानधन वाढीचा आदेश काढून अद्यापही त्याची अमंलबजावणी झाली नाही. त्यामुळे होमगार्डची निराशा झाली आहे. परिणामी आर्थिक समस्या त्यांना उद्भवत आहे. त्यामुळे मानधन वाढ त्वरीत करावी.