मतदात्यांना फिल्मी सेलिब्रिटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:37 AM2019-04-01T00:37:09+5:302019-04-01T00:38:13+5:30

निवडणूक हा पैशांचा डावपेच खेळण्याचा तद्वतच लोकांचे मनोरंजन करणारा खेळ झाला आहे. हल्ली प्रचार सभेतून नेत्यांचे बेताल बोलणे, भाषणांतून एकमेकांवर खालच्या स्तरातून टीका करणे याला मनोरंजनच म्हणावे लागेल.

Waiting for movie celebrities for voters | मतदात्यांना फिल्मी सेलिब्रिटींची प्रतीक्षा

मतदात्यांना फिल्मी सेलिब्रिटींची प्रतीक्षा

Next

वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : निवडणूक हा पैशांचा डावपेच खेळण्याचा तद्वतच लोकांचे मनोरंजन करणारा खेळ झाला आहे. हल्ली प्रचार सभेतून नेत्यांचे बेताल बोलणे, भाषणांतून एकमेकांवर खालच्या स्तरातून टीका करणे याला मनोरंजनच म्हणावे लागेल. यात भर असते चित्रपट सृष्टीतील नट नटी यांचे रोड शो आणि प्रचार सभांमध्ये त्यांची असलेली हजेरी!
फिल्मी कलावंतांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या भाषणाने उमेदवाराला निवडणुकीत किती फायदा होतो, हा प्रश्न अलहिदा. मात्र या निमित्ताने सामान्य लोकांना सिलेब्रिटींना जवळून बघता व ऐकण्याची संधी मिळते. त्यांच्या उपस्थितीमुळे लोकांची गर्दी जमते व वातावरण निर्मिती होते. म्हणूनच राजकीय पक्ष आणि श्रीमंत मालदार उमेदवार आपल्या प्रचारार्थ फिल्मी नट नट्यांना आणत असतात. त्यांना बोलायला लावतात.
बल्लारपूर - चंद्रपूरला, दरवेळच्या लोकसभा वा विधानसभा निवडणुकीप्रसंगी फिल्मी सेलिब्रिटींची कुठे ना कुठे हजेरी असतेच असते. या निमित्ताने दरखेपेला नवीन नवीन चेहरे बघायला मिळतात. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कोणते फिल्मी कलावंत येणार, याची प्रतीक्षा येथे लोकांमध्ये लागली आहे. सुधीर मुनगंटीवार यांची चित्रपट कलावंताशी जवळीक आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांचीही चित्रपट कलावंतांशी बरी ओळख आहे. ब्रह्मपुरीला त्यांनी मोठ-मोठ्या कलावंतांना आणले आहे. त्यामुळे या दोघांच्या प्रयत्नाने भाजपा व कॉंग्रेस या पक्षांकडून या क्षेत्रात चित्रपट कलावंत मोठ्या संख्येने हजेरी लावू शकतात. कोण व कधी येईल, याची प्रतीक्षा लोकांना आहे.

राजेश खन्नांचे ‘ये पब्लिक है...’
तसे बघता पडद्यावर संवाद लेखकांचे संवाद तडफेने बोलणाऱ्या नट-नट्यांना प्रत्यक्षात मंचावर बोलताना घाम फुटतो. प्रसंगी ते नको ते बोलून जातात. विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचे उमेदवार शाम वानखेडे यांच्या प्रचाराकरिता सुपर स्टार राजेश खन्ना हे बल्लारपूर येथे कॉलरी मैदानावर आले होते. भाषण द्यायला ते माईकवर आले, तेव्हा आपण काय बोलावे हे त्याला सुचेना. ये पब्लिक है ये सब जानती है... बस एवढे बोलून, कॉंग्रेसला मते द्या असे म्हणण्याऐवजी कॉंग्रेस को धक्का मारो असे तो वेगळेच बोलून गेला. हे ऐकून मंचावरील काँग्रेसी स्तब्ध झाले. प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

हेमामालिनीला बघायला उसळली होती गर्दी
मागील लोकसभेच्या निवडणुकीत हेमामालिनीही येऊन गेल्या. ही स्वप्नसुंदरी फारशी काही बोलली नाही. लोकांना त्यांना जवळून बघता आले एवढाच आनंद. या ड्रीमगर्लला बघण्यासाठी पंचक्रोशीतील गर्दी उसळली होती. त्यांच्या प्रचार सभेला, रोड शोला लोकांची चांगलीच गर्दी झाली होती.

Web Title: Waiting for movie celebrities for voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.