आदिलाबाद पॅसेंजरची प्रवाशांना प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:56 PM2019-05-15T23:56:19+5:302019-05-15T23:56:32+5:30
वणी येथील रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेकडून गेल्या ३० वर्षापासून नागपूर आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा- माजरी -वणीमार्गे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु अजूनपर्यंत ही पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांना या ट्रेनची अजूनही प्रतीक्षा आहे.
राजेश रेवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वणी येथील रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेकडून गेल्या ३० वर्षापासून नागपूर आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा- माजरी -वणीमार्गे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु अजूनपर्यंत ही पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांना या ट्रेनची अजूनही प्रतीक्षा आहे.
नागपूर-आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा-माजरी- वणी मार्गे सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाश्यांची आहे. ही रास्त मागणी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गे पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता व माजरी ते आदिलाबादपर्यंतचा रेल्वे लाईन रेल्वे सिग्नल, रेल्वे गेट, रेल्वे प्लॅटफॉर्म व संबंधित सर्व सुविधांकरिता करोडो रुपये खर्च करून काम करण्यात आले. परंतु रेल्वे प्रशासनाद्वारे १८ वर्षे काम पूर्ण होऊनही या मार्गावर अजून नागपूर-आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन सुरू झालेली नाही.
माजरी ते आदिलाबाद रेल्वे रुळाचे व इतर महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यावर २ फेब्रुवारी २००३ मध्ये ही गाडी सुरू होईल. असे रेल्वे प्रवासी वाहतूक संघाला तोंडी माहिती देत होते. आज जवळजवळ २० वर्ष होऊनही ही ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी केंद्र सरकारचे रेल्वे मंत्री हे अनेक रेल्वेगाड्या सुरू करण्याचा खोटे आश्वासन देत असतात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही पॅसेंजर ट्रेन अजून सुरू झाली नाही. याकडे रेल्वे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासी वाहतूक संघाने केला आहे. दिवसेंदिवस बसच्या तिकीट दरात मोठी वाढ होत असल्याने प्रवाशांना रेल्वेचा प्रवास सोईस्कर होत असते.
अनेक रेल्वेगाड्या सुरू
माजरी आदिलाबाद या मार्गावर नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, पूर्णा- पटणा एक्स्प्रेस, नांदेड- संत्रागाची एक्स्प्रेस, कोल्हापूर बोधगया दीक्षाभूमी एक्स्प्रेस आणि मुंबई- काझीपेट ही साप्ताहिक ट्रेन सुरू झाली. परंतु गेल्या ३० वर्षांपासून मागणी असतानाही नागपूर- आदिलाबाद ट्रेन सुरू झाली नाही, हे रेल्वे प्रवाशांचे दुर्दैव आहे.