पेल्लोरा-निर्ली रस्त्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:12 PM2018-05-13T23:12:40+5:302018-05-13T23:12:40+5:30
राजुरा तालुक्यातील निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्यापही रस्त्यांनी जोडली गेली नाहीत. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांचे हात होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्यापही रस्त्यांनी जोडली गेली नाहीत. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांचे हात होतात.
निर्ली येथील विद्यार्थ्यांना झाडे- झुडूपांमधून वाट काढत पेल्लोरा येथील शाळा-महाविद्यालयात जावे लागते.
निर्ली आणि पेल्लोरा येथील शेतकºयांना शेताकडे जाण्यास मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र, दखल घेण्यात आली नाही. हा रस्ता कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जोडला असल्याने या परिसरातील रुग्णांना उपचारास जाण्याकरिता आवश्यक आहे. हडस्ती मार्गावर पुल तयार केल्यास किनबोडी व पेल्लोरा येथील नागरिकांना चंद्रपूरला जाण्यास सोयीचे होणार आहे. या मार्गावरील निर्ली जवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात हाल होतात. साखरी आणि निर्ली परिसरातील शंकरदेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हजारो भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होतात. मात्र जाण्याकरिता मार्ग नसल्याने एक किमी अंतरावर मोठी कसरत करावी लागते.
सरकारने ग्रामीण भागातील रस्ते बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. परंतु, कोरपना व राजुरा तालुक्यातील अनेक गावांत अद्याप रस्ते नाहीत. विद्यार्थ्यांना पायी जावे लागते.
पावसाळ्यात शाळेत जाता येत नाही. ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने हा प्रश्न अद्याप सोडविला नाही. त्यामुळे आमदार अॅड. संजय धोटे यांची भेट घेवून रस्त्याची मागणी करण्यात आलेली आहे. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र रस्त्याचे बांधकाम करण्यास अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. पेल्लोरा, किनबोडी, निर्ली, चार्ली येथील ग्रामस्थांच्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.