बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Published: June 20, 2016 12:33 AM2016-06-20T00:33:23+5:302016-06-20T00:33:23+5:30

या वर्षी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर बळीराजाही शेतीच्या हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागला.

Waiting for strong rains for the victims | बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

Next

जिल्हा कोरडाच : हवामान खात्याच्या अंदाजानंतरही पाऊस नाही
चंद्रपूर : या वर्षी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर बळीराजाही शेतीच्या हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागला. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बी-बियाणांच्या खरेदी केली आहे. आता हंगामपूर्व मशागतीची कामेही संपुष्टात येत आहेत. दोन-तीनदा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र हा पाऊस अत्यल्प होता. आता बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
विशेष म्हणजे, हवामान खात्याने शनिवारी मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मागील सतत दोन वर्ष शेतकऱ्यांना दुर्दैवी ठरले. आधी अतिवृष्टीने मारले. नंतर अल्पवृष्टीने नुकसान केले. या दोन वर्षात शेतकरी चांगलाच कर्जबाजारी झाला. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी पूर्णता खचून गेला होता. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र पैसेवारीत जिल्हा पात्र ठरला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मदत मिळाली नाही. मागील दोन वर्षांचे झालेले नुकसान विसरून बळीराजा पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे. शेतातील अनावश्यक कचरा स्वच्छ करण्यात आला आहे. शेणखत टाकण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुंपणाचीही आतापासूनच व्यवस्था करून ठेवलीे आहे. नांगरणी-वखरणीची कामेही सुरू असून तीसुध्दा अंतिम टप्प्यात आहे. इकडे कृषी विभागानेही खरीप हंगामाचे नियोजन करून ठेवले आहे. यंदा कृषी विभागाने ४ लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कापूस १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन १ लाख १८ हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी कापसाने दगा दिल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंत दर्शविली होती. मात्र यावेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाची लागवड वाढणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमूग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ऐनवेळी शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने खते मागविली आहेत. खताची एक खेप जिल्ह्यात उपलब्धही झाल्याची माहिती आहे.
एकूणच हंगामपूर्वीची सर्व कामे आता आटोपली आहेत. आता बळीराजा केवळ पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मागील दोन-चार दिवसांपासून वातावरणातही फरक पडला आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होते. जिल्ह्यात दोन-तीनदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरीही लावली आहे. मात्र हा पाऊस किरकोळ स्वरुपाचा होता. आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)

अंदाज चुकेल का, अशी भीती
हवामान खात्याने यावर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडेल, व मान्सून वेळेवर दाखल होईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले. आता शनिवारी पुन्हा पुणे येथील हवामान खात्याने मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे म्हटले आहे. २४ तासात विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज होता. मात्र जिल्ह्यात रविवारी दिवसभर पाऊस आला नाही. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकेल काय, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

खताच्या लिंकिंगची शक्यता
खरीप हंगामात कृषी केंद्रधारकांकडून बी-बियाणे व खतांचा तुटवडा दाखवून अधिकच्या भावाने खत व बियाणांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच खताची लिंकिंगही केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात कृषी विभागाने पथके गठित केली

दरपत्रक लावणे आवश्यक
कृषी केंद्रधारकांनी आपापल्या केंद्रात खत व बियाणांचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. दरपत्रक लावले आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे, अशी मागणी आहे. यासोबतच केंद्रधारकांनी त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकची माहितीही दरपत्रकात नमूद करणे अनिवार्य आहे.

Web Title: Waiting for strong rains for the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.