चंद्रपूर जिल्ह्यातील तहानलेल्या गावांना टँकरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:16 PM2018-04-10T14:16:47+5:302018-04-10T14:18:45+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावून गावकऱ्यांची तहान भागविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
रवी जवळे
चंद्रपूर : चंद्रपूरसह संपूर्ण जिल्हाच सध्या पाणी टंचाईने बेजार झाला आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाने कृती आराखडा तयार करून हातावर हात ठेवले आहे. कृती करण्याचा त्यांना विसर पडला आहे. जिल्ह्यात ९५८ गावात भीषण पाणी टंचाई आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावून गावकऱ्यांची तहान भागविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. अकराही मोठे सिंचन प्रकल्प अखेरची घटका मोजत आहे. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा आहे. नद्यांमध्ये पाणी नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. हातपंप, विहिरी, बोअरवेल यामध्येही पाणी नाही. जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ९५८ गावात पाणी टंचाई आहे. जि.प. च्या सर्व्हेक्षणाचा हा आकडा असला तरी प्रत्यक्षात हजारो गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहे. लखमापूर, बिबी, नांदा, कोठोडा, धामणगाव, नैतामगुडा, आसर (बु.), खिर्डी, वडगाव, चन्नई, मांगलहिरा, कोरपना, वनसडी, पिपर्डा, कोडशी (बु.), धोपटाळा, कन्हाळगाव, पिट्टीगुडा, भुरी येसापूर, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, पाटागुडा, कुंभेझरी, घनपठार यासारख्या अनेक गावात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. जिवती, कोरपना तालुक्यात तर खड्डा खोदून त्यातील पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. हातपंपाला पाणी नसल्याने त्यात पाणी जमा होण्याची वाट पाहत गावकरी रात्रभर जागे राहतात. मध्यरात्री उठून पाणी भरतात. एवढी भीषण परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर लावला नाही. टंचाईग्रस्त गावातील गावकरी सातत्याने गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. मात्र या मागणीकडे जिल्हा प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. असेच दुर्लक्ष होत राहिले तर पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्ष एखाद्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपाययोजना अनेक; पण अंमलबजावणी नाही
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने आपल्या आराखड्यात विहिरीचे खोलीकरण, इनवेल बोअर मारणे, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहिरी, कुपनलिका लावणे, तात्पुरती पुरक योजना निर्माण करणे, बंद पडलेले हातपंप, पाणी पुरवठा योजना दुरुस्त करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आराखड्यात या उपाययोजनांच्या समोर आकड्याचे गणितही मोठ्या दिमाखाने मांडण्यात आले आहे. १३६१ उपाययोजनांचे काम प्रस्तावित आहे. मात्र प्रत्यक्षात यातील कोणत्याही उपाययोजना पूर्णत्वास गेलेल्या नाही.