१२ वर्षांपासून आदिवासी घरकुलाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: July 14, 2014 11:53 PM2014-07-14T23:53:28+5:302014-07-14T23:53:28+5:30
राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील नागरिक मागील १२ वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना उघड्यावर संसार करावा लागत आहे. लाभार्थ्यांना त्वरित घरकूल मंजूर करावे,
विरूर (स्टे) : राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील नागरिक मागील १२ वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना उघड्यावर संसार करावा लागत आहे. लाभार्थ्यांना त्वरित घरकूल मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.
राजुरा तालुक्यातील नवेगाव हे गाव आदिवासीबहुल आहे. येथील बहुतांश नागरिक गरीब आहेत. २००२ च्या दारिद्र्यरेषेखालील यादीत येथील २० घरकूल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केले. यात प्रल्हाद विठोबा आळे यांचेसुद्धा नाव आहे. त्यातील १९ लाभार्थ्यांना घरकूल मिळाले, मात्र प्रल्हाद विठोबा आळे यांना अजूनही घरकूल योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत प्रल्हाद आळे यांनी ग्रामपंचायत भेंडाळा व पंचायत समिती येथे विचारणा केली असता प्रल्हाद आळे यांच्या दारिद्र्यरेषेखालील यादीतील जातीत बदल झाल्यामुळे घरकूल योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे सांगितले. तसेच संबंधितांचे जातीच्या संबंधाने ठोस पुरावे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, सरपंच व सचिवाचे प्रमाणपत्र, तसेच १०० रुपये स्टॅम्प पेपरवर अफेडिव्हीट करणे आवश्यक आहे, असेही सांगितले. त्यानुसार प्रल्हाद आळे यांनी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, सरपंच, सचिव यांचा दाखला व इतरही कागदपत्र पंचायत समिती कार्यालयात सादर केले. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्या कागदपत्राला केराची टोपली दाखविली. याबाबत वारंवार संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन, तोंडी तक्रार देऊनही अधिकारी मात्र उडवाउडवीचे उत्तर देत आहेत.
नवेगाव येथील दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये जातीने अनुसूचित जमाती असलेल्या लाभार्थ्यांचा नावासमोर अनुसूचित जाती असा प्रवर्ग लिहिला आहे व अनुसूचित जातीच्या नावासमोर अनुसूचित जमातीचा प्रवर्ग लिहिला आहे, असे असताना १९ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला. मात्र प्रल्हाद आळे यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. ज्या अधिकाऱ्यातर्फे सदर यादीत घोळ झाला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी व घरकूल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी प्रल्हाद आळे यांनी केली आहे. तसेच घरकूल योजनेचा लाभ न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करणार, असेही एका पत्रकाद्वारे कळविले आहे. (वार्ताहर)