ओबीसी बांधवांचा वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च
By साईनाथ कुचनकार | Published: February 13, 2024 04:36 PM2024-02-13T16:36:30+5:302024-02-13T16:36:40+5:30
ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा चंद्रपुरात समारोप
चंद्रपूर : ओबीसींची जातनिहाय जनगना करावी, ओबीसींचे ७२ वसतिगृह, आधार योजना, तसेच शासनाने नुकतीच काढलेली अधिसूचना रद्द करावी, या मागणीसाठी सेवाग्राम येथून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा चंद्रपूर येथे वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च काढून समारोप करण्यात आला.
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातून ही यात्रा चंद्रपूर शहरात पोहचली. ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोर्राम, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता वडगाव फाटा येथून पैदल मार्च काढण्यात आला. मित्र नगर येथे जाहीर सभेनंतर दीक्षाभूमीवर समारोप करण्यात आला.
यावेळी उमेश कोराम, प्रा. अनिल डहाके, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, प्रा. सूर्यकांत खनके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनस्वी संदीप गिर्हे व आभार प्रमोद पाटील यांनी मानले. यासाठी ॲड. विलास माथनकर, लक्ष्मण धोबे, विजय टोंगे, नंदू नागरकर, राजू बनकर, प्रा. नरेंद्र बोबडे, सुनील मुसळे, शैलेश जुमडे, विनोद राऊत, डॉ. ताटेवार, डॉ. संजय घाटे, अनिल धानोरकर, ॲड. जगदीप खोब्रागडे, डॉ. गावतुरे, ॲड. प्रशांत सोनुले, प्रा. विधाते, गोमती पाचभाई, पांडुरंग टोंगे, देवराव सोनपितरे यांनी परिश्रम घेतले.