वरोरा शहरभर फिरून नीलगाय पोहोचली रेल्वेस्थानकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 09:20 PM2022-06-17T21:20:55+5:302022-06-17T21:21:24+5:30
Chandrapur News एक नीलगाय जंगलातून वरोरा शहरात आली. फिरत फिरत तिने शहर पालथे घातले. सर्व नागरिक तिला कुतूहलाने बघत होते. त्यानंतर ही नीलगाय चक्क वरोरा रेल्वेस्थानकात दाखल झाली.
चंद्रपूर : वन्यप्राण्यांनी वरोरा शहराकडे मागील काही महिन्यांपासून धूम ठोकणे सुरू केले आहे. अशातच एक नीलगाय जंगलातून वरोरा शहरात आली. फिरत फिरत तिने शहर पालथे घातले. सर्व नागरिक तिला कुतूहलाने बघत होते. त्यानंतर ही नीलगाय चक्क वरोरा रेल्वेस्थानकात दाखल झाली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १७) सकाळच्या सुमारास घडला.
रेल्वे रूळ ओलांडून रेल्वेस्थानकाच्या समोरील प्रवेशद्वारातून पुढे निघून गेली. नीलगाय रेल्वे रूळावर पोहोचण्याच्या काही क्षणापूर्वी रेल्वेगाडी निघून गेल्याने ती थोडक्यात बचावली.
काही दिवसांपूर्वी वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावाच्या वसाहतीमध्ये बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते, तर वरोरा शहरालगतच्या मोहबाळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वसाहतीमध्ये रानडुकराने एका व्यक्तीवर हल्ला करून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना घडली होती. नीलगाय वरोरातील वसाहतीमधून धावत धावत तिने चक्क वरोरा रेल्वेस्थानक गाठले. रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्मवर उडी घेण्याच्या नादात ती पडली. काही वेळाने उठून रेल्वे प्लेटफॉर्म ओलांडून रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून मालवीय वाॅर्डकडे निघून गेली. यामध्ये ती जखमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शुक्रवारी दिवसभर या नीलगायीचीच चर्चा होती.