पावले चालती, राष्ट्रसंतांच्या तपोभूमीची वाट

By admin | Published: January 12, 2017 12:35 AM2017-01-12T00:35:59+5:302017-01-12T00:35:59+5:30

खंजेरीच्या खणखणाटाद्वारे गावागावात भजनाच्या माध्यमातून जनजागृती करीत अनिष्ठ रूढी, परंपरांवर आघात करीत ...

Walking the feet, the path of national pride | पावले चालती, राष्ट्रसंतांच्या तपोभूमीची वाट

पावले चालती, राष्ट्रसंतांच्या तपोभूमीची वाट

Next

गोंदेडा (गुफा) येथे उसळणार गुरुदेव भक्तांचा जनसागर : राष्ट्रसंतांची तपोभूमी भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज
चिमूर : खंजेरीच्या खणखणाटाद्वारे गावागावात भजनाच्या माध्यमातून जनजागृती करीत अनिष्ठ रूढी, परंपरांवर आघात करीत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ज्या भूमीत राष्ट्रसंतांनी साधना केली, याच गोदेंडा भूमित भरणाऱ्या यात्रेसाठी लाखो गुरुदेव भक्ताची पावले तपोभूमीची वाट धरणार आहेत. तीन दिवसीय गुंफा यात्रेला प्रारंभ होणार असून गुरूवारी गोपालकाला होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली गावात झाला असला तरी त्यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा (गुंफा) याच भूमिला ओळखले जाते. याच गुफेमध्ये राष्ट्रसंतांनी साधना केली. याच परिसरात राहून महाराज गावागावात जनजागृती करीत होते. चिमूर तालुक्यात महाराजांच्या भजनाने मोठी क्रांती घडवून आणली व हिच क्रांती देशात अजरामर झाली. याच क्रांतीमुळे परिसरातील जनतेमध्ये महाराजाविषयी मोठे प्रेम आहे. महाराजासोबत वास्तव्य केलेले अनेक प्रत्यक्षदर्शी गुरुदेव भक्तही आहेत. त्यामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे.
गोंदेडा (गुंफा) येथे राष्ट्रसंतांनी १९५९ ला घुगरीकाला केला तर महाराजांनी स्वत: या जागेवर १९६१ ला पहिली यात्रा भरवली. तेव्हापासून आजपर्यंत ही यात्रा परिसरातील गुरुदेव भक्तासाठी गुफा समितीकडून भरविण्यात येते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवासाठी दरवर्षी लाखो गुरुदेव भक्त श्रद्धेने गोंदेडा या गावात येवून गुरुदेवापुढे नतमस्तक होवून एक नवी उर्जा घेवून जातात.
गुरुवारी पौष पोर्णिमेच्या दिवशी आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या निमित्ताने विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, शेगाव अशा अनेक ठिकाणाहून लाखोच्या संख्येत गुरुदेव भक्त मिळेल त्या वाहनाने गोंदेड्यात दाखल होणार आहेत. या भक्ताच्या व्यवस्थेसाठी आयोजकाची तयारी पूर्ण झाली असून गुरुदेव भक्तांच्या स्वागतासाठी तपोभूमी सज्ज झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

आज गोपालकाला
गुरूवारी लाखो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत गोंदोड्याचा गोपालकाला होणार आहे. पहाटे ग्रामसफाईनंतर सामुदायिक ध्यान, ध्यानाच्या महत्वावर रवींद्रकुमार गुरुजी, रामधूनच्या महत्वावर विठ्ठलराव सावरकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पालखी सत्कार सोहळा, पालखी श्रमदान यज्ञ, आधुनिक युगातील रोग व पंचगण्य चिकित्सा, त्यानंतर गोपालकाला संकीर्तन (लक्ष्मणदास काळे महाराज), गुंफा यात्रा महोत्सव समितीची निवडणूक होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.अशोक नेते, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, आ. मितेश भांगडिया, आ. कीर्तीकुमार भांगडिया, विशेष अतिथी म्हणून गुरूकुंज मोझरीचे सर्वाधिकारी प्रकाशपंत वाघ, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, चिमूर पं.स. च्या सभापती वैशाली येसांबरे, उपसभापती विलास कोराम, जि.प. सदस्य गीता लिंगायत, पं.स. सदस्य वर्षा लोणारे, गुंफा समितीच्या अध्यक्ष अरुणा अडसोडे, गोंदोड्याचे सरपंच राजेंद्र धारणे, जि.प. सदस्य दिनेश चिटनूरवार, जितू होले आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम व गोंडी जलसाचे आयोजन केले आहे. यात्रा महोत्सवात आ. बंडी भांगडिया यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप होणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याची विनंती यात्रा समितीने केली आहे.

Web Title: Walking the feet, the path of national pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.