शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:38 AM2018-04-26T00:38:08+5:302018-04-26T00:38:08+5:30

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर आहे. अशातच विद्यार्थी व पालकांचा कल मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाकडे झुकत आहे. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळा अडचणीत आल्या आहेत.

Wandering for teachers' students | शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी भटकंती

शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी भटकंती

Next
ठळक मुद्देपटसंख्येकरिता धडपड : शाळा व्यवस्थापनाचे फर्मान

अनेकश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर आहे. अशातच विद्यार्थी व पालकांचा कल मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाकडे झुकत आहे. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळा अडचणीत आल्या आहेत. प्रत्येक माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी शोध मोहिमेचे फर्मान सोडले आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी ही धडपड आहे. यासाठी शिक्षक विद्यार्थी मिळविण्यासाठी सर्वत्र भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे.
जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात सार्वजनिक शिक्षण क्षेत्रातच शिक्षणाचे धडे गिरविले जात होते. मध्यंतरी शिक्षण क्षेत्र खासगी, अनुदानित, कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थाचा शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण झाला. परिणामी शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात सर्वत्र व्यापले आहे. यामुळे वर्ग तुकड्यात वाढ झाली. विद्यार्थ्यांशिवाय शाळा चालू शकत नाही. यातूनच शाळेशाळेत विद्यार्थी पटसंख्या पुरेशा प्रमाणात राखण्याचे आव्हान संस्था चालकासमोर उभे आहे. शाळेच्या नोकरीत कायम राहावयाचे असल्यास शाळेसाठी विद्यार्थी मिळवा, असे फर्मानच शाळेच्या व्यवस्थापनाने सोडले आहे.
आजघडीला चंद्रपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळेची संख्या ३१० इतकी आहे.
यात अनुदानित १२५, विनाअनुदानित ३३ तर १५२ कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे खासगी माध्यमिक एकूण शाळा ५०६ आहेत. यामध्ये अनुदानित ३६०, विनाअनुदानित ३३ तर ११३ कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे.
या शाळेतील शिक्षक विद्यार्थी मिळविण्यासाठी दारोदार भटकंती करीत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेतील शिक्षक मात्र विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. परिणामी दिवसेंदिवस जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी संख्या झपाट्याने खालावत आहे.
बल्लारपुरात जि.प. व न.प. शाळा अडचणीत
शिक्षण जीवनमान उंचावणारे आहे. मूल्यवर्धित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते. सार्वजनिक शिक्षण क्षेत्रामुळे गरीब पालकांच्या विद्यार्थ्यांची जडणघडण होते. परंतु शाळा जास्त व विद्यार्थी कमी अशी अवस्था बल्लारपूर तालुक्यात आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या २९ व नगर परिषदेच्या १६ शाळा विद्यार्थ्यांअभावी अडचणीत आल्या आहेत. बल्लारपूर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २१, उच्च प्राथमिक शाळा सात तर माध्यमिक एक शाळा आहे. बल्लारपूर नगर परिषदेमध्ये १४ प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक प्रत्येकी एक शाळा आहे. खासगी प्राथमिक १० तर कायम विनाअनुदानित २५ शाळा असून खासगी माध्यमिक विभागात १७ अनुदानित, विनाअनुदानित एक व कायम विनाअनुदानित ११ अशा एकूण ११० शाळांचा समावेश बल्लारपूर तालुक्यात आहे.
जिल्ह्यात २,५२४ शाळा
जिल्ह्यात एकूण दोन हजार ५२४ शाळा कार्यरत आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार ५९३, नगरपालिकेच्या ७३, शासकीय १५, खासगी प्राथमिक ३१०, खासगी माध्यमिक ४४६, सैनिकी व नवोदय विद्यालय प्रत्येकी एक तर केंद्रीय विद्यालय तीन या शाळेंचा समावेश आहे. सर्वाधिक शाळा जिल्हा परिषद प्रशासनाच्या असूनही येथील शिक्षक पटसंख्येविषयी गंभीर नाही. त्यामुळे पटसंख्या रोडावली आहे. खासगी शिक्षणसंस्थाचे विद्यार्थ्यांना व पालकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिषही याला कारणीभूत आहे. परिणामी जिल्हाभरात १५ ते २० जिल्हा परिषद शाळांवर पटसंख्याअभावी गडांतर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Wandering for teachers' students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.