चंद्रपूर भागात बछड्यांसह फिरणाऱ्या वाघिणीचे पुन्हा दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:48 PM2018-03-17T14:48:38+5:302018-03-17T14:48:46+5:30
नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात ७ मार्चपासून वाघिणीने आपल्या तीन बछड्यासह मुक्काम ठोकला आहे. गावकऱ्यांनी वनविभागावर दबाव टाकल्यानंतर येथील वनाधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुध्द करण्याची वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात ७ मार्चपासून वाघिणीने आपल्या तीन बछड्यासह मुक्काम ठोकला आहे. गावकऱ्यांना सतत वाघिणीचे दर्शन होत आहे. शुक्रवारी पुन्हा शेतकऱ्याला वाघिणीचे बछड्यासह दर्शन झाले. जनावरांसह शेतकऱ्यांवरही वाघीण हल्ला करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागावर दबाव टाकल्यानंतर येथील वनाधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुध्द करण्याची वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे.
गिरगाव येथील मोठा नाला परिसर, भिवा नगर परिसर, लेंडारी शेतशिवार याठिकाणी सतत वाघीण बछड्यासह गावकऱ्यांना दिसत आहे. बुधवारी सावरगाव - कन्हाळगाव रोडलगत बैलाला ठार केले. गुरुवारी गिरगाव येथील मंगरू पर्वते यांच्या शेतात गोऱ्हाला वाघिणीने ठार केले. दैव बलवत्तर म्हणून मंगरु पर्वते बचावले. त्यानंतर गिरगाव येथील शेतकरी गोपाला थेरकर व त्यांचे सहकारी सुरेश शेंडे यांच्यावर शेतात कामे करीत असताना वाघिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आरडाओरड केल्यानंतर वाघीण पळून गेली. या वाघिणीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे सिंदेवाही तालुक्यातील किन्ही, मुरमाडी या परिसरात दोन व्यक्तींना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावे लागला आहे. याच घटनेची पुनरावृत्ती गिरगावात घडू नये, यासाठी गिरगाव ग्रामस्थांनी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांना वाघिणीच्या बंदोबस्ताबाबत निवेदन दिले. परिसरातील शेतकरी धानाचे दुबार पीक घेतात तर काही शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करतात. विशेष म्हणजे, याच मार्गाने शालेय विद्यार्थी सायकलने ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत व शेतकऱ्यांना शेतात जावे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वनविभागाचे कर्मचारी रात्रंदिवस परिसरात गस्त घालत आहेत. फटाके फोडून वाघिणीला पळविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र वाघीण पळाली नाही. दरम्यान, वाघाच्या बंदोबस्ताबाबत शुक्रवारी गिरगाव येथील वनविभागाच्या नाक्यावर ग्रामस्थ व वनाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर वाघिणीसाठी गठीत केलेल्या चौकशी समितीचीही बैठक झाली. गावकऱ्यांचा दबाव वाढत असल्याने वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के व चौकशी समितीने वाघिणीला बेशुध्द करण्याची व तिला बछड्यासह चपराळा किंवा इतर जंगलात सोडण्याची परवानगी मागितली आहे.