धो-धो पावसामुळे वर्धा, पैनगंगा व इरई नदीला पुन्हा पूर; अनेक रस्ते बंद

By राजेश भोजेकर | Published: July 28, 2023 12:07 PM2023-07-28T12:07:46+5:302023-07-28T12:09:55+5:30

इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले, चंद्रपूर शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली, शेकडो घरात पुराचे पाणी, अनेक रस्ते बंद

Wardha, Panganga and Irai rivers flooded again after overnight rains | धो-धो पावसामुळे वर्धा, पैनगंगा व इरई नदीला पुन्हा पूर; अनेक रस्ते बंद

धो-धो पावसामुळे वर्धा, पैनगंगा व इरई नदीला पुन्हा पूर; अनेक रस्ते बंद

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटे पासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे चंद्रपूर शहरात अनेक वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. वर्धा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने चंद्रपूर - राजुरा, घुगुस - चंद्रपूर , वरोरा - वणी - यवतमाळ मार्ग बंद झाला आहे. इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे.

शुक्रवारी पहाटे अडीच वाजता पासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. राजकला सिनेमा गृहाचे मागील भागात नाल्याचे पाणी निघण्यास मार्ग नसल्याने हा रस्ता बंद झाला आहे. शेकडो घरात पाणी शिरले आहे. गटारे व नाले सफाई झाली नसल्यामुळे नाले तुंबून रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सामानांची मोठ्या प्रमणात नासधुस झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.  गंज वॉर्ड, श्री टॉकीज, तुकुम तथा वाहतूक पोलिस शाखा कार्यालय, हॉटेल सिद्धार्थ या भागात रस्त्यावर पाणी आहे . तसेच  जलनगर, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, वडगाव, नगिनाबाग, रामनगर, बिनबा गेट, पठाणपुरा, नागपूर रोड, रहमत नगर, लखमापूर, अंचलेश्वर गेट या भागात अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पठानपुरा गेटच्या बाहेर पाणी आल्याने राजनगर, सहारा कॉलनी पाण्याखाली आहे. तेथील लोकांना इतरत्र हलविण्याचे काम सुरू आहे. नदी काठावरील रहमतनगर या खोलगट भागातील वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. तेथील लोकांना इतरत्र हलविण्याचे काम सुरू आहे.

हे मार्ग बंद

राजुरा -बल्लारपूर, राजूरा - सास्ती, धानोरा -भोयगाव, गौवरी कॉलनी - पोवणी, तोहोगाव, कोरपना - कोडशी, रूपापेठ - मांडवा, जांभूळधरा - उमरहिरा, पिपरी - शेरज, पारडी - रुपापेठ, कोडशी - पिपरी, कोरपना - हातलोणी, कुसळ - कातलाबोडी - कोरपना, शेरज - हेटी

इरई धरणाचे २ दरवाजे उघडले 

जिल्हा प्रशासनाने आज सकाळी १० वाजता इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले आहे. त्यामुळे इरई नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. इरई नदी तथा नाल्याचे लगतच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील अनेक वस्त्या मधील लोक आता घर सोडून बाहेर पडत आहेत.

फेक आदेशाने अनेक शाळा बंद

काही समाज माध्यमांवरून शुक्रवार २८ रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचा संदेश समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून २८ जुलै रोजी शाळा महाविद्यालयाच्या सुट्टीबाबत कोणताही आदेश काढण्यात आला नाही. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. 

- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर

Web Title: Wardha, Panganga and Irai rivers flooded again after overnight rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.