वर्धा पॉवरचे काम सुरळीत
By admin | Published: April 5, 2015 01:37 AM2015-04-05T01:37:33+5:302015-04-05T01:37:33+5:30
वर्धा पॉवर प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने वर्धा पॉवर कंपनी बंद करीत असल्याची घोषणा विधान परिषदेमध्ये राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी केली.
वरोरा : वर्धा पॉवर प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने वर्धा पॉवर कंपनी बंद करीत असल्याची घोषणा विधान परिषदेमध्ये राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी केली. याबाबत वृत्त प्रकाशित होताच, कामगारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. परंतु, वर्धा पॉवर कंपनीला पर्यावरण खात्याची नोटीस मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी परिसरात फेरफटका मारला असता, शनिवारी कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.
वरोरा शहरालगच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वर्धा पॉवर हा खासगी वीज निर्मिती प्रकल्प सन २०११ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पामध्ये १३५ मेगावॅटचे चार युनीट असून त्यामध्ये ५४० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत होती. वीज देण्यासंबंधीचे काही करार मागील काही वर्षात संपुष्टात आल्याने मागील दोन वर्षांपासून १३५ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येत आहे. उर्वरित तीन युनिट बंद आहेत.
या प्रकल्पाला मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एकही नोटीस मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यातच मागील वर्षापर्यंतची बँक गॅरंटी प्रकल्पाला मिळाली असल्याचे समजते. या सत्रात बँक गॅरंटीची परवानगी मिळाली असून ती मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती आहे. वर्धा पॉवर कंपनीचे १३५ मेगावॅटचे एकच युनिट सुरू आहे व दोन वर्षात कंपनीला पर्यावरण विभागाची नोटीसही मिळाले नसल्याने कंपनीला टाळे ठोकण्याची घोषणा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)