वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित
By Admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:04+5:302015-12-05T09:07:04+5:30
राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.
कमी दाबाचा वीज पुरवठा : विद्युत उपकेंद्राला मंजुरीची प्रतीक्षा
चंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्टयात येणाऱ्या गावांत कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. परिणामी मोटारपंप चालत नसुन विहीरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असुनही शेती सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे.
वर्धा नदी पट्टयातील कोलगाव, कढोली बु., मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सुर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपीक आहे. कापूस, मिरची, सोयाबीन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपल्या शेतात मोठी गुंतवणूक करून बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असतानादेखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. पिकांना पाण्याची गरज असतांनाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
या परिसराला विरूर स्टेशन येथील सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीज पुरवठा होतो अथवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सबस्टेशनचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असुन वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांच्या अडचणींचा विचार करून संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, अरूण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहु पाटील भोयर, एकनाथ कौरासे, कवडू पाटील कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलीक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपतराव हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, प्रदीप दुबे, संजय उमरे, प्रमोद धांडे, विजय धांडे, रामदास पंधरे, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, अनिल बहिरे, विजय निवलकर, अनिल आस्वले, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (प्रतिनिधी)