वरोऱ्यातून वर्धेत दारुचा पुरवठा
By admin | Published: June 15, 2014 11:28 PM2014-06-15T23:28:58+5:302014-06-15T23:28:58+5:30
वरोरा शहरात अलीकडच्या काळात दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मद्यदुकानदार गब्बल बनत चालले आहे. ही दारूविक्री केवळ वरोरा येथील मद्यपींच्याच भरोशावर नसून वरोरावासीयांच्या नावावर दारुबंदी
चंद्रपूर : वरोरा शहरात अलीकडच्या काळात दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मद्यदुकानदार गब्बल बनत चालले आहे. ही दारूविक्री केवळ वरोरा येथील मद्यपींच्याच भरोशावर नसून वरोरावासीयांच्या नावावर दारुबंदी असलेल्या वर्धेतील मद्यपींसाठी ही दारू जात असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
वरोरा पोलीस ठाण्यांतर्गत चालु महिन्यात तब्बल १ लाख ६८ हजार १७३ लिटर दारुची विक्री झाली. या शहराची १८ वर्षावरील पुरुषांची संख्या केवळ १६ हजार आहे. हे सर्वच मद्य घेतात, असे गृहीत धरले तरीही या प्रत्येकाच्या वाट्याला रोेज ३५० मि.मी. मद्य येते. हे मोजमाप न पिताच कोणालाही ‘नशा’ चढविणारे आहे. मात्र, मद्यविक्रीचा आकडा वाढण्यामागे वेगळेच कारण असल्याचा जाणकारांचा दावा आहे. वरोरा येथून दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सर्रास मद्य पोहोचविले जाते. त्यामुळे येथील दारुविक्रीची आकडेवारी वाढलेली आहे.
वर्धा येथे दारु पोहोचविण्यासाठी मद्यतस्करांसाठी वरोरा हे शहर सोयीचे आहे. वरोरा पोलीस ठाण्यांतर्गतत २० बार, सहा देशी दारुची दुकाने, दोन वाईन शॉपी, चार बीअर शॉपी आहेत. १६ हजारांच्या शहरात एवढ्या मोठ्या संख्येत बारची संख्या कुणालाही चक्रावून टाकणारी आहे. मात्र यामागे मोठे अर्थपूर्ण गणित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहराची १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या १६ हजार असताना महिन्याकाठी तब्बल १ लाख ६८ हजार १६३ लिटरच्या जवळपास मद्यविक्री होत आहे.
याचाच अर्थ असा की येथील प्रत्येक पुरुष रोज ३५० मि.मी. मद्य घेतो. हे शक्यच नाही. त्यामुळे ही दारु नेमकी जाते कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी वर्धा जिल्ह्यात असल्याचे सांगितले. मद्यविक्रीचा आकडा हा अधिकृत आहे. याशिवाय अवैध दारुची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. ती वेगळीच आहे. ग्रामीण भागात तसेच वरोरा शहरात अवैध मद्यविक्री सर्रास सुरू आहे. पोलिसांच्या नजरेत हा प्रकार का आली नाही, हा प्रश्न आहे.