मुंगलेंच्या काँग्रेस प्रवेशाने वारजुकरांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:06+5:302021-07-17T04:23:06+5:30
नागभीड : चिमूरचे धनराज मुंगले यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंगले यांच्या काँग्रेस प्रवेशाने चिमूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय ...
नागभीड : चिमूरचे धनराज मुंगले यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंगले यांच्या काँग्रेस प्रवेशाने चिमूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलणार, असे प्रारंभी वाटत होते. मात्र, समीकरणे बदलण्याऐवजी या क्षेत्रात काँग्रेसमधीलच गटबाजी आणखी उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेली अनेक वर्षे चिमूर तालुका भाजपाचे अध्यक्ष होते. मागील विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढलेल्या धनराज मुंगले यांनी मुंबई येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला. या प्रवेशाने काँग्रेसला त्यांचे आणि काहीअंशी त्यांच्या समाजाचे बळ मिळणार आहे. असे असले तरी मुंगले यांच्या काँग्रेस प्रवेशाने चिमूर विधानसभा क्षेत्रात तेवढीच गटबाजी उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकदा आमदार राहिलेल्या दोनदा विधानसभा लढलेल्या माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर तसेच मागील विधानसभेची निवडणूक हरलेले जि. प.चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांना व त्यांच्या गटाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेला शह असल्याचेही बोलले जात आहे. या प्रवेशाने वारजूकर बंधूंची मोठी अडचण झाल्याची चर्चा आहे. वारजूकर बंधू मुंगले यांचा काँग्रेस प्रवेश सहजरित्या घेतील का, हा प्रश्न आहे.
चिमूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसमध्ये उघडउघड दोन गट आहेत. एक वडेट्टीवारांना, तर दुसरा गट वारजूकरांना मानणारा आहे. गेली २५ वर्षे वारजूकर कुटुंब या मतदारसंघात कार्यरत आहेत. जिल्ह्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही चिमूरचे दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांना मानणारा एक वर्ग आताही या मतदारसंघात कार्यरत आहे. आपले अस्तित्व अधिक बळकट करण्यासाठी वडेट्टीवार हे मुंगले यांना बळ देणार हे निश्चित. मुंगले यांनीही पुढील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवूनच काँग्रेस प्रवेश केला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हे वारजूकर बंधूंना मुळीच खपणार नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंगले हे वारजूकर यांच्या निकट गेले होते. यातूनच वारजूकर यांनी निवडणुकीत मुंगले यांना उतरवून भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
बाॅक्स
सतीश वारजूकर राष्ट्रवादीत जाणार?
मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व डाॅ. सतीश वारजूकर यांच्यात बंदद्वार चर्चा झाली होती. यानंतर सतीश वारजूकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्याही होत्या. काँग्रेसकडून स्वबळाची भाषा सुरू आहेच. मुंगले यांच्या काँग्रेस प्रवेशाने वारजूकर यांच्या पुढील विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी डॉ. सतीश वारजूकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.