सावधान, चंद्रपूर होतेय उष्णतापूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:14 PM2019-04-26T22:14:49+5:302019-04-26T22:15:18+5:30
वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषत: चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषत: चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीचा म्हणजे २०१८ चा उन्हाळा हा १९०१ पासूनचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र २०१९ हा उच्चांक मोडत आहे. मध्य भारतातल्या बहुतेक सर्वच नगरांमध्ये यंदा उन्हाळ्यात किमान सरासरी ०.५ अंशांनी अधिक तापमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.सध्यातरी चंद्रपूर शहरात उष्माघाताचा बळी पडल्याच्या एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात असणाºया संभाव्य उष्णतेच्या लाटेपासून सर्वांनी स्वत:चे संरक्षण करणे गरजेचे आहे.
उन्हाच्या उष्णतेमुळे शरिरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे-तहान लागली नसेल तरी, थंड (गार) पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी, थंड पेये - ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, कापडाने डोके झाकावे, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांची विशेष काळजी घ्यावी.
मनपाचा हीट अॅक्शन प्लॅन
उष्णतेचे दुष्परिणाम व उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर मनपातर्फे 'हीट अॅक्शन प्लॅन' (उष्माघात कृती आराखडा) मार्च महिन्यापासूनच राबविण्यास सुरुवात केली आहे. यात उष्माघात प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत असून विविध स्वयंसेवी संस्था व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची जागोजागी उपलब्धता करणे, सार्वजनिक बगिचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, मनपा आरोग्य केंद्राद्वारे उष्माघात रुग्णांवर औषधोपचार सुविधा, जिल्हा सार्वजनिक रुग्णालयात शीत खोली (कोल्ड वॉर्ड) स्थापना, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल इत्यादी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
काळजी हाच उष्माघाताला पर्याय
वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरिरावर तसेच सृष्टीतील इतर जीवजंतूंवर दुष्परिणाम होतात. उष्णतेशी निगडित आजारपण व मृत्यू टाळता येणे शक्य आहे. तरीदेखील दरवर्षी अनेक लोक उष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. त्यामुळे काळजी हेच उष्माघातापासून वाचण्याचा पर्याय आहे. वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अधिक जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या आहेत.'उष्णतेची लाट ' ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याबाबतीत आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
भर उन्हात शाळा सुरूच
चंद्रपूरचे तापमान सातत्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने, महापालिकेने जिल्ह्यात आरेंज अलर्ट जारी केले आहे. पारा ४५ अंशापार जात आहे. असे असतानाही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरूच आहे. यात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्याचा समावेश आहे. व्यवस्थापनाने याबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.