वरोरा आमदाराचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:10 PM2018-10-31T23:10:32+5:302018-10-31T23:11:50+5:30
जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषिपंपांना नवीन वीज जोडणी देण्याकरिता योजनेअंतर्गत १९ निविदा काढण्यात आल्या. परंतु त्यात दोन लाख ५० हजारांपर्यंत ज्यांचा विद्युतीकरणाचा खर्च असेल, त्यांनाच या योजने अंतर्गत वीज पुरवठा मिळणार आहे, असे ऐकिवात असल्याचे आ. बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे. परंतु ज्यांच्या विद्युतीकरणाचा खर्च दोन लाख ५० हजाराच्या वर जातो, त्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडणीबाबत काय उपाययोजना केल्या आहे आणि सदर निविदा या फक्त ३१ मार्च २०१८ पूर्वी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना लागू होत आहे. तर मग त्यांच्या नंतरच्या डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे? किंवा त्यांच्या कृषिपंपाचे विद्युतीकरण केव्हा करणार, असा सवाल आ. धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.
मागील सात महिन्यांपासून कृषिपंपासाठी दिली जाणारी डिमांड मिळत नाही आहे, याचे कारण स्पष्ट करावे व कृषिपंप शेतकऱ्यांना वीज पुरवठा हा २४ तास करण्यात यावा. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृषिपंपास विद्युत पुरवठा देण्यात यावा. थ्री फेज व सिंगल फेजचे मीटर वीज वितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, सहसंपर्क प्रमुख रमेश देशमुख, रमेश तिवारी, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, सोहेल शेख, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, सिक्की यादव, सुरेश पचारे, मनोज पाल व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना थ्री फेज वीज द्या - मुनगंटीवार
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचे अस्तित्व असल्याने रात्रीच्या वेळी शेतामध्ये ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना धोका पत्करावा लागतो. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये दिवसा थ्री फेज वीज पुरवठा कृषिपंपांना देण्याची मागणी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी मान्य केली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांना हा फार मोठा दिलासा आहे.