असा असायचा बल्लारपुरातील तेंदूपत्ता हंगाम

By Admin | Published: May 27, 2015 01:19 AM2015-05-27T01:19:31+5:302015-05-27T01:19:31+5:30

जंगल जवळ लागून असलेल्या ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत तेंदूपत्ता तोडणीचे काम सुरू असायचे.

That was why the Tandupta season in Ballarpur | असा असायचा बल्लारपुरातील तेंदूपत्ता हंगाम

असा असायचा बल्लारपुरातील तेंदूपत्ता हंगाम

googlenewsNext

विद्यार्थिदशेतील मुलेही जायची जंगलात : तेंदूपत्ता तोडाईतून जंगल भ्रमंतीचाही आनंद
वसंत खेडेकर बल्लारपूर
जंगल जवळ लागून असलेल्या ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत तेंदूपत्ता तोडणीचे काम सुरू असायचे. या दिवसात बालपणी अनेकजण गावाला लागून असलेल्या जंगलात भर दुपारी आणि कडक उन्हात तेंदूपत्ता तोडण्याकरिता जात असत. ते दिवस अजूनही चांगले आठवतात. तेंदूपत्ता आणि त्यांच्या मुडक्याला बांधण्याकरिता उपयोगात आणल्या जाणाऱ्या वाकाचा विशिष्ट गंध अजुनही चांगला स्मरणात आहे.
५५-६० वर्षापूर्वी बल्लारपूर हे फार मोठ गाव नव्हते. पॉवर हाऊस, कोळसा खाण, पेपर मिल, लाकडाचे कोठार आणि मध्यरेल्वेचे शेवटचे आणि महत्वाचे स्टेशन यामुळे औद्योगिकनगर म्हणून या गावाला ओळखले जायचे. बामणी- चंद्रपूर मार्गावर बल्लारपूरच्या हद्दीतील मार्गाच्या एका बाजूला म्हणजे रेल्वे स्टेशन ते पेपर मिल या परिसरात पोस्ट आॅफिस, त्यानंतर लाकडांच्या पसारा आणि झुडपी जंगल तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला राजेंद्र प्राथमिक शाळा, त्यालाच लागून बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, चर्च, पटेल सॉ मिल, दादाभाई पाटरीज, पेपर मिल समोरील रुप महल टॉकीज (आता त्या ठिकाणी प्रिती अ‍ॅन्ड प्रशांत पाईप फॅक्टरी) त्याच्याच बाजूला गुप्ता आणि एका सरदाराचे हॉटेल पुढे आणि वर उल्लेखीत जागांच्या मागे जंगल पसरले होते. नगर परिषद आणि पोलीस ठाणा तोपर्यंत जुन्या वस्ती भागातून स्थानांतरित व्हायचे होते. बल्लारपूरला लागून असलेल्या या जंगलात सर्वच जातीची वृक्षे होती. कुठे घनदाट तर कुठे विरळ जंगल होते. रानडुक्कर, ससे आणि कोल्ह्यांचा तेथे वावर असायचा. या जंगलात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात असे आणि त्याकाळी विडी बनविण्यासाठी या पत्त्याची भरपूर मागणी असायची. तेंदूपत्ता संकलन ठेकेदार, थडी (नदी काठावरील शेत- वावर) किरायाने घेऊन तेथे तेंदूपत्ता संकलित करीत असत. जंगलातून तेंदूपत्ता आणून थडीवर ते विकायला आणणाऱ्यांना बऱ्यांपैकी पैसे मिळत असे. यामुळे घरच्या मोठ्या मंडळीसोबत उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी दशेतील मुलही पानं तोडायला जंगलात जात असत. घरच्यांना थोडी मदत आणि जंगलातत फिरण्याचा आनंद असा दुहेरी उद्देश त्यामागे विद्यार्थ्यांचा असायचा. गावातील बरेचशा घरातून तेंदूपत्ता संकलनाकरिता लोक जायचे. अनेकांची आर्थिक स्थिती बरी नसल्याने अनेक महिला जंगलात सकाळीच सूर्य उगविण्यापूर्वी तेंदूपत्ता तोडण्याकरिता जात असे. अधून-मधून लहान मुलेही हट्ट करुन महिलांसोबत जंगलात म्हणजे दादाभाई पाटरीजचे मागे जात असत. सोबत वाळलेल्या लांब दुधी भोपळ्याच्या आत पाणी भरुन नेत असायचे. याच मोसमात जंगलात टेंभरं आणि खिरण्या लागलेल्या असायच्या. तेंदूपत्ता तोडण्याहून ती रानफळं तोडून खाण्यात मुलांना अधिक रस असायचा आणि पाखराने खाऊन अर्धे असलेले टेंभरं आवडीने ते खात असत. त्यात अधिक गोडवा वाटायचा. जंगलात फिरता-फिरता दादाभाई पाटरीज ते रुपमहल टॉकीजच्या मागेपर्यंत कसे यायचे, हे कळतच नसे. अशी झपाट्याने जंगलात वेळ निघून जायची. महिला उत्साहाने खूप तेंदू पाने तोडायच्या. एवढे की त्याचे दोन मोठे गाठोडे व्हायचे. ते घरी आणल्यानंतर एक एक पत्ता चवळून त्याचे मुडके बांधणे, असे सायंकाळ उशिरापर्यंत चालायचे. मग ते वर्धा नदीच्या काठावरील थडीवर ते विकायला नेत असत.
त्याकाळी १०० मुडक्याचे पाच रुपये मिळत असत. किंवा कधी-कधी त्यापेक्षाही कमी पैसे मिळायचे. या पैशांचा घर चालवायला चांगला हातभार लागायचा. तेंदूपत्त्याचा हंगाम सर्वसामान्य घरात एक वेगळेच चैतन्य आणायचा. हाताला काम मिळायचे. पोरांना या निमित्ताने जंगलात भटकायला मिळायचे. आता सारे बदलले. थडीच्या जागांवर मोठाली घरे झालेत. जंगलाच्या ठिकाणी दूरवरपर्यंत लोकवस्ती झाली. जंगल कितीतरी दूर गेले. विडी ओढण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे तेंदूपत्त्याची मागणीदेखील पूर्वी सारखी दिसत नाही.
आजही थोडे बहुत लोक तेंदूपत्ता तोडायला जंगलात जाताना दिसतात. परंतु चित्र बदलले आहे. जंगलाला लागून असलेल्या ग्रामीण भागात अजूनही तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात चालत आहे. झाडीपट्टीतील बरेच शेतमजूर या हंगामात तेंदूपत्ता तोडणीकरिता गडचिरोली जिल्ह्यात वा आंध्र प्रदेशातील सीमावर्ती भागात जातात. दीड-दोन महिने तेथे मुक्काम ठोकून चार पैसे गाठीला घेऊन येतात. तेंदूपत्ता संकलनाला आजही महत्व आहेच! थोडा फरक पडला, एवढेच!

Web Title: That was why the Tandupta season in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.