सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:13 PM2019-06-27T23:13:38+5:302019-06-27T23:13:56+5:30
जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एन. डी. हॉटेल येथे घेण्यात आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एन. डी. हॉटेल येथे घेण्यात आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार तर प्रमुख मार्गदर्शक कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, दिल्ली येथील साहस संस्थेच्या प्रकल्प संचालक सोनिया गर्ग, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे कार्यकारी संचालक सुधाकर बोबडे घनकचरा व्यवस्थापक दामोधर पुजारी, निकिता गुंडेचा, सिनिथा जयराम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. खेमणार म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सर्वांनाच काळजीत टाकणारा आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचे प्रेरक म्हणून भूमिका पार पाडावी. स्वच्छतेच्या सवयी बालमनापासून देण्यासाठी शाळेपासुन सुरवात करावी. कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी कोकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला व रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राबविलेल्या घनकचरा प्रकल्पांची माहिती दिली. उपस्थितांनी विविध पैलुंवर चर्चा केली.
प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे यांनी केले. कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.