विसर्जन मिरवणुकीवर १०० सीसीटीव्हीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:33 PM2019-09-06T23:33:29+5:302019-09-06T23:33:53+5:30
सोमवारी मोठ्या उत्साहात जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाले. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर नजर केंद्रीत केली आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला विशेष सूचनाही दिल्या आहे.
साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या असून यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिरवणुकीतील हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १०० सीसीटीव्हींची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दारूविक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून अट्टल दारुविक्रेत्यांना विसर्जनाच्या दिवशी जेलबंद करण्यात येणार आहे.
सोमवारी मोठ्या उत्साहात जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाले. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर नजर केंद्रीत केली आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला विशेष सूचनाही दिल्या आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरात गुरुवारी सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरातील विविध मार्गांवर मचाणीही उभारल्या आहेत. काही दिवसात विधानसभा निवडणूक आहे. यामुळे मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ५० तसेच महापालिकेद्वारे ५० असे एकूण १०० सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील विविध मार्गांवर लावण्यात येणार असून याद्वारे मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी लक्षात घेता शहरातील अट्टल दारूविक्रेते पोलिसांच्या रडारवर त्यांना जेलबंद करण्यात येणार असून ९०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.
५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
मुंबई पोलीस कायद्यातील विविध कलमांचा वापर करून त्याअंतर्गत संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर उत्सवापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, शहरातील किमान ५० च्या वर अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असून त्यांना ३ ते ४ दिवसांसाठी जिल्हाबंदी करण्यात येणार आहे.
गुरुवारी चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर येथे विसर्जन
चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर येथे अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. तसेच मूल, राजुरा येथील गणेश विसर्जन १३ सप्टेंबर रोजी तर ब्रह्मपुरी येथील गणेश विसर्जन १४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये, मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी विविध उपाययोजन करण्यात आल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान संशयास्पद स्थितीत कुणी आढळून आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी.
-डॉ.महेश्वर रेड्डी,
जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर