पोलिसांचा दारुविक्रेत्यांवर वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:15 PM2019-03-20T22:15:40+5:302019-03-20T22:16:06+5:30
धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोे. होळीला दारु प्राशन करुन धुळवड खेळण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल राहत असल्याने अनेकजण मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारुला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोे. होळीला दारु प्राशन करुन धुळवड खेळण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल राहत असल्याने अनेकजण मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारुला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारुविक्री विरोधात ठोस भूमिका घेत आहेत. तसे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देशही आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यात कोणकोणत्या छुप्या मार्गाने दारुची आयात केली जाते. कोणत्या वेळेत दारुची आयात होते, याबाबतची सर्व माहिती ठेवून दारु बंदी करण्यासाठी कृती कार्यक्रमही आखण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने चंद्रपूर, घुग्घुस, राजुरा, वरोरा शहरातून जाणाºया मुख्य मार्गावर नाकाबंदी केली गेली आहे. सर्वच मुख्य मार्गावर पोसिलांकडून नाकाबंदी सुरु आहे. या नाकाबंदीरम्यान आवागमन करणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून प्रक्रिया सुरु आहे. या काळात होळी सणानिमित्त नागरिकांना दारु पुरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांची राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यावरही नजर ठेवली आहे.
४ लाख ३ हजार दोनशे रुपयांची दारू जप्त
जिवती : तालुक्यातील पिट्टीगुडा (नंदप्पा) पोलिसांनी बुधवारी पहाटे मौजा झालीगुडा येथे ४ लाख ३ हजार दोनशे रुपयांची दारू जप्त केली. यासंदर्भात वाहन चालक श्रिनीवास राजय्या चिटावेना (२५) रा.गोदावरीकनी जि. पेदापल्ली (तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपी फरार आहेत. आोरपी बोलेरो पीक अप क्र.टीएस.२२ टी ३०५७ मध्ये दारू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून ५६ पेट्या दारू, चार लाख तीन हजार दोनशे रुपये व बोलेरो पीक अप किंमत चार लाख रुपये असा आठ लाख तीन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीनंतर जिवती तालुक्यातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे समजते. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल बडकेलवार,विशाल बगळे,राहुल चांदेकर,खंडेराव माने आदींनी केली.
७५ हजारांचा हातभट्टी दारूसाठा जप्त
चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील शिवारात छापा टाकून ७५ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. घटनास्थळी कोणीच उपस्थित नसल्याने सदर साठा बेवारस म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक ए.डब्ल्यू. क्षीरसागर, किशोर पेदूजवार, जगदीश मस्के, संदीप राठोड आदींनी केली आहे.