पहाडावरील १० गावांमध्ये पेटणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:23 PM2018-02-21T23:23:20+5:302018-02-21T23:24:03+5:30
तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.
मनोज गोरे ।
आॅनलाईन लोकमत
कोरपना : तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.
यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले. पहाडावरील अनेक गावांमधील बोरवेल बंद पडल्या. पिण्याच्या पाण्यासाठी अन्य साधन नसल्याने महिलांचे हाल होत आहे. संवर्ग विकास अधिकारी घोन्सीकर, तहसीलदार गाडे यांनी नुकताच टंचाईग्रस्त गावाचा दौरा करुन पाहणी केली. सरपंच व ग्रामसचिवांकडून माहिती मागवून उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. परंतु पत्येक्षात कोणतेही कामे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
टंचाईग्रस्त गावांमधील महिला प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करीत आहेत. कातलाबोडी, पारधीगुडा, शिवापूर, बोरगाव, भोईगुडा, परसोडा गुडा, भागलहिरा, उमरहिरा आदी गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या समपातळीवर असलेल्या गावांमध्ये टंचाई नाहीत. परंतु, अनेक बोरवेल बंद आहेत. ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केली. परंतु आर्थिक मर्यादा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई गावाची माहिती घेवून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा एप्रिल- मे महिन्यात पाण्यासाठी गावागावांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे हाल
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी मिळत नसल्याने बाहेरुन आणण्याची वेळ आली. ग्रामीण रुग्णालयात पुरेसे पाणी मिळत नाही, असा आरोप केला जात आहे.
पाण्याची टाकी शोभेची वास्तू
ग्रामीण रुग्णालय परिसरात पाण्याची टाकी बांधण्यात आली. पुरेसे पाणी मिळत नसल्याने शोभेची वास्तू ठरली आहे. पंचायत समिती, पोलीस स्टेशन व विविध शासकीय कार्यालयामध्येही मुबलक पाणी मिळत नाही.
शहरामध्ये टंचाई निर्माण झाल्यास टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात आम्ही खबरदारी घेत आहोत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून उपाययोजनेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
- नंदा बावणे, नगराध्यक्ष, कोरपना
तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. संकटग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना केली जाणार आहे.
- हरिश गाडे, तहसीलदार, कोरपना