३५ वर्षांनंतर मिळाले पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 10:14 PM2018-11-04T22:14:02+5:302018-11-04T22:14:53+5:30

सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात चारशे हेक्टर सिंचन क्षमता एका बंद पडलेल्या तलावाने वाढवली आहे.

Water after 35 years! | ३५ वर्षांनंतर मिळाले पाणी !

३५ वर्षांनंतर मिळाले पाणी !

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : मौलझरी तलावाची सिंचन क्षमता चारशे हेक्टर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात चारशे हेक्टर सिंचन क्षमता एका बंद पडलेल्या तलावाने वाढवली आहे. अधिकाऱ्यांच्या कल्पकतेला शासन-प्रशासनाची मिळालेली साथ यामधून हा चमत्कार चंद्रपूर जिल्ह्यात साकारला गेला आहे.
साधारण चाळीसी ते पन्नाशीमध्ये गेलेल्या पिढीला चंद्रपूर-मूल राज्यमार्गावर असणारा मौलझरी लघू पाटबंधारे तलाव आठवत असेल. १९७२-७३ मध्ये या तलावाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सन १९८३ मध्ये या तलावाच्या धरण पाळीचे काम पूर्ण करण्यात आले. या तलावातून चारशे हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल, अशी आशा या भागातील नागाळा, महादवाडी, गोंडसावरी या गावांना होती. मात्र दरवर्षी येणारा पाऊस तलाव भरून काढायचा. पण काही दिवसातच धरण पाळीतून ३५ वर्ष सतत पाणी वाहून जात होते.
त्यामुळे या तीनही गावातील नागरिक सातत्याने काहीतरी उपाययोजना होऊन पाणी साठेल, यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागे लागत होते. मौलझरी लघू पाटबंधारे तलाव व त्यासाठी करण्यात येणाºया प्रत्येक उपाययोजनेबाबत या काळात आणखी एक व्यक्ती सातत्याने विधानसभेमध्ये लढत होता. ते होते तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार !
२०१४ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मात्र ना. मुनगंटीवार यांनी आपल्या जुन्या मागणीसाठी पुन्हा एकदा या तलावाबाबत काय करता येईल, यासाठी अधिकाºयांना विचारमंथन करायला सांगितले. पाटबंधारे विभागाचे चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी तलावाच्या धरण पाळी खालून होणारी गळती थांबविण्याकरिता सिमेंट ग्राउंटींग करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला.
हा प्रस्ताव पुढे ठेवताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा एका ठिकाणी केलेला यशस्वी प्रयोग पालकमंत्र्यांना सांगितला. कार्यकारी अभियंता सोनोने यांचा प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. २७ मार्चला भूमिपूजन झाले आणि त्यानंतर चार महिन्यांपर्यंत पाळीच्या मध्यभागातून तीन समांतर रंगांमध्ये जलरोधी खंदकाच्याही खाली खडकांमध्ये सरासरी चार मीटर खोलीपर्यंत मशीनद्वारे डीलिंग करून सिमेंट ग्राउंटीग करण्यात आले. यामुळे या खडकांमध्ये भेगा राहिलेल्या आहेत त्या भागामध्ये सिमेंट जाऊन बसते. त्यामुळे या धरणाची भिंत कायमस्वरूपी अभेद्य झाली असून आता पुढच्या अनेक वर्षांपर्यंत या धरणामधून पाणी लिकेज अर्थात पाण्याची गळती होणार नाही.
जलयुक्तला ‘चांदा ते बांदा’ ची मदत देऊ : मुनगंटीवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रापुढे ठेवलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. मौलझरी तलाव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कल्पक व धाडसी अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण कायम असतो. हा प्रकल्प पुनर्जिवित करण्यासाठी गेली अनेक वर्षे मी लढा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जलयुक्त शिवार योजनेतून या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी व परिपूर्णतेसाठी चांदा ते बांदा योजनेतूनही निधी दिला जाईल. हा प्रकल्प पुढच्या वर्षी आणखी पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल अशी, मला आशा असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
प्रयोगाला मान्यता मिळाल्याचा आनंद : सोनोने
या प्रकल्पाबद्दल बोलताना कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी अधिकाऱ्यांच्या प्रयोगशीलतेला कल्पक नेतृत्वाने पाठबळ दिल्याचा हा चमत्कार असल्याचे सांगितले. गेली अनेक वर्षे या जिल्ह्यांमध्ये काम करताना ही उपाययोजना सूचवली होती. यावर निधी कोठून खर्च करायचा आणि ही योजना यशस्वी होईल का, असा प्रश्न करून आपली बोळवण होत होती. मात्र पालकमंत्र्यांनी या प्रयोगावर विश्वास ठेवत पाठबळ दिल्याने आज सत्य पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Water after 35 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.