पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणी

By admin | Published: June 26, 2017 12:32 AM2017-06-26T00:32:26+5:302017-06-26T00:32:26+5:30

पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही.

Water from the bucket to survive parahti | पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणी

पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणी

Next

शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड : आकाशात ढग जमतात; पण पाऊस येईना !
प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हाटीची लागवड केली. एक दोन वेळा पाऊस येऊन निघून गेला. आकाशात ढग जमतात. पण पाऊस येत नाही. अपुऱ्या पावसाने जमिनीत टाकलेले कपाशीचे बियाणे सडून गेले. मात्र आहे ते तरी बियाणे उगवेल, या एकाच आशेपोटी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा पऱ्हाटीला वाचविण्यासाठी बादलीने पाणी टाकत आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी भास्कर जुनघरी यांनी कपाशीला जगविण्यासाठी बादलीने पाणी टाकण्याची अनोखी धडपड चालविली आहे. पाणी टाकले नाही तर पऱ्हाटी जिवंत राहणार नाही. म्हणून गडीमाणसांना सोबत घेऊन हा युवा शेतकरी कपाशीला वाचविण्यासाठी जीवनाचे रान करीत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आकाशात काळे ढग जमतात. मात्र पाऊस शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवित निघून जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी शेतात सिंचन करुन पऱ्हाटीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना पाणी देऊन पिक जगविता येत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतीचे दिवस आज वाईट आले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग साथ देत नाही. अस्मानी, सुल्तानी संकटात शेतकरी नेहमीच भरडला जातो. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जबाजारीपणाचा फास अधिकच गच्च आवळत आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. पाऊस येईल या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करुन ठेवली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने हुलकावनी दिली. एक-दोन वेळा पाऊस येऊन अचानक गायब झाला. कपाशीला उगवणीसाठी दोन- तीन दिवसाआड पाणी देणे आवश्यक असते. पाऊस वेळेवर आला नाही तर जमिनीत लागवड केलेले बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका असतो आणि नेमके शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे. उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी बि-बियाण्यांची जुळवाजुळव करुन शेती केली. सुरुवातीपासूनच पाऊस येईल या आशेवर कपाशीची लागवड केली. मात्र क्षणातच पावसाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली.
पाऊस येत नसल्याने संकट आणखी वाढले असून गोवरी परिसरात बादलीने पाणी टाकून पऱ्हाटीला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे.

पाण्याअभावी शेती झाली रामभरोसे
कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पाऊस पडत नसल्याने शेतीला अवकळा आली आहे. सरकारसह निसर्गानेही आता शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. शेती पिकण्याचा कोणताच भरवसा उरला नसल्याने शेती आता रामभरोसे झाली आहे.

शेतात पऱ्हाटी पिकाची लागवड केली आहे. तुरळक पावसाने कपाशीचे बियाणे सडून मातीमोल होण्याचा धोका आहे. पाण्याची नितांत आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने बादलीने पाणी टाकून कपाशीला वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- भास्कर जुनघरी, शेतकरी गोवरी

Web Title: Water from the bucket to survive parahti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.