रेल्वेच्या भुयारी मार्गावर पाणीच पाणी; १० गावांचा संपर्क तुटला
By साईनाथ कुचनकार | Published: July 21, 2023 04:45 PM2023-07-21T16:45:24+5:302023-07-21T16:46:34+5:30
गवराळा रेल्वे गेट नं. ३६ पूर्णपणे बंद
चंद्रपूर : भद्रावती येथून पिपरी देशमुख गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर शुक्रवारी दुपारी कोसळलेल्या पावसामुळे पाणी साचले. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. विशेष म्हणजे या रेल्वे भुयारी पुलाच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला घेऊन परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर प्रशासनाने पाण्याच्या बंदोबस्तासाठी काही उपाययोजना केल्या. मात्र, शुक्रवारी कोसळलेल्या पावसामध्ये या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहे.
भद्रावती येथून चिरोदेवी, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोच्ची, घोनाड या गावाकडे जाण्यासाठी चंद्रपूर ते माजरी या रेल्वे लाईनवरील गेट नंतर ३६ वर भुयारी रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाच्या निर्मितीपासूनच परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, शुक्रवारी कोसळलेल्या पावसामध्ये हा भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली आल्याने वाहतूक खोळंबली. विशेष म्हणजे, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनधारकांना याच खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. त्यातच आता मार्गच पूर्णपणे बंद झाल्याने भद्रावतीचा संपर्क तुटला आहे.
डिझेल पंप बसविले, पण पाणी संपेना
या रेल्वे भुयारी मार्गावर पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने तब्बल तीन डिझेल पंप लावण्यात आले आहे. मात्र, पाणी कमीच होत नसल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.