पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:47 PM2018-08-08T22:47:47+5:302018-08-08T22:48:02+5:30
जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे.
अनकेश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे. यामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. मात्र निसर्गाची हुलकावणी सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
बल्लारपूर तालुक्याचे सरासरी ११३२ मिमी पर्जन्यामान आहे. मागील वर्षी तालुक्यात केवळ ४१.८७ टक्केच पाऊ स पडला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामावर विपरीत परिणाम झाला आणि बळीराजा आर्थिक संकटात ओढला गेला. यावर्षी देखील तालुक्यातील शेतकºयांवर अरिष्ठ ओढावल्याचे चिन्ह दिसत आहे. आजतागायत तालुक्यात ६३४.४ मिमी पावसाची नोंद झाली. तरीही शेतशिवार कोरडे आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
तालुक्याचे कृषी क्षेत्र कोरडवाहू असल्याने सिंचन सुविधाचा अभाव आहे. नाममात्र शेतकºयांकडे ओलीताची सोय असली तरी मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचे कृषी व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने हुलकावणी देण्यास सुरूवात केली. यामुळे शेतकरी गतवर्षीच्या संकटातून सावरण्याऐवजी पुन्हा संकटाच्या मार्गावरून वाटचाल करीत आहे.
शेती व्यवसाय दरवर्षी तोट्यात जातोे. तरीही शेतकरी उत्पादनासाठी जीव ओतून राबतो. पीक कर्जाचा अडथळा पार करून काहींनी कर्ज घेतले. काहींनी सावकाराकडून कर्ज घेत बी-बियाण्यांची व खताची तरतूद केली. मशागत केलेल्या शेतात पेरणी केली. मात्र निस२र्गाची साथ बळीराजाला मिळत नसल्याने हिरवेगार पीक करपण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी येत आहे.
७ हजार ११५ हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड
७ हजार ११५ क्षेत्रात तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये २ हजार ३९० हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली. कापसाचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र ३ हजार ९८२ हेक्टर इतके आहे. सोयाबीन १२८ हेक्टरमध्ये लागवड असून गळीत धान्य १२८, हळद ९.३०, मिरची ८ व भाजीपाला १०७ हेक्टरमध्ये लावण्यात आले आहे.