कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी घटली
By admin | Published: May 23, 2014 11:45 PM2014-05-23T23:45:47+5:302014-05-23T23:45:47+5:30
वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यातील खाण परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने शेतातील मोटारपंप कोरडे पडत आहे. उन्हाळी शेतपिकांवर त्याच्या विपरीत परिणाम होत आहे.
प्रकाश काळे - हरदोना
वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यातील खाण परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने शेतातील मोटारपंप कोरडे पडत आहे. उन्हाळी शेतपिकांवर त्याच्या विपरीत परिणाम होत आहे. वेकोलि परिसरातील १० ते १२ गावांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणार्या राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणी देशाच्या विकासात भर घालणार्या असल्या तरी, त्याचे दुष्पपरिणाम कोळसा खाण परिसरातील जनतेला सहन करावे लागत आहे. गोवरी, पोवनी, सास्ती, साखरी, अंतरगाव, गोयेगाव परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने शेतकर्यांच्या जमिनी अधिगृहित करून कोळसा खाण सुरू केल्या. खासगी बोअरवेलपेक्षा कोळसा खाणी २०० ते ३०० फुट खोल असल्याने परिसरात असलेल्या गावांतील पाण्याची पातळी खालावत आहे. वेकोलि पाण्याचा प्रचंड उपसा करीत आहे.पाण्याचे स्त्रोत कोळसा खाणींकडे खेचले जातात. त्यामुळे वेकोलिलगत शेती असणार्या शेतकर्यांच्या बोरवेल कोरड्या पडत आहे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला असल्याने उन्हाळी शेतीकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. सिंचन करून शेती पिकविण्याचा मानस असताना शेतात बोरवेल खोदल्या आहे. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने बोरवेल कुचकामी ठरत आहे. बोअरवेल सुरु केल्यानंतर १५ ते २० मिनीटानंतर पाणी बाहेर येते. त्यामुळे सिंचन करणे आता कठिण झाल्याची प्रतिक्रिया गोवरी येथील शेतकरी प्रभाकर जुनघरी यांनी दिली. वेकोलि लगत असलेल्या शेतकर्यांना जंगली प्राण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शेतात जागल केल्यानंतरही वन्यप्राण्याचे कळप शेतपिकांवर तुटून पडतात. कोळसा खाणीतून धुळीचे लोंढे शेतपिकांवर येत असल्याने पीके पूर्णत: खराब होतात. परंतु वेकोलिकडून शेतकर्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. राजुरा तालुका कापूस पिकासाठी अग्रेसर मानला जातो. परंतु कोळशाच्या धुळीने पांढरे सोने मातीमोल होत आहे. कापूस कोळशाच्या धुळीने काळा पडत असल्याने कापसाची प्रतवारी घसरुन शेतकर्यांनाा कवडीमोल भावात कापूस विकावा लागत आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकर्यांना सहन करावा लागतो. गोवरी, पोवनी, सास्ती, गोयेगाव, माथरा, साखरी, मानोली, बाबापूर, चार्ली, कळमना, निंबाळा, हिरापूर, अंतरगाव परिसरातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. सिंचनाची शेती पाण्याअभावी प्रभावीत झाली आहे. शेतात बोरवेल खोदली तर पाणी लागत नाही आणि पाणी लागले तर दीर्घकाळ पाणी शेतीसाठी पूरत नाही. अशी शेतकर्यांची बिकट अवस्था झाल्याने भविष्यात वेकोलि परिसरातील गावांना पाणी मिळणे कठीण जाणार आहे.