जलयुक्त शिवार अभियानाने जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 10:11 PM2018-11-04T22:11:12+5:302018-11-04T22:11:32+5:30
राज्य शासनाने २०१४ पासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने २०१४ पासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. नाला खोलीकरण, शेततळ्याचे निर्माण, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, जमिनीतील पुनर्भरण, जुन्या सर्व प्रकल्पांना दिलेली नवसंजीवनी, सुरू करण्यात आलेले नवे प्रकल्प, गोसेखुर्दच्या पाण्यामुळे वाढलेले सिंचन, धरणांमध्ये वाढलेला पाणीसाठा, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पाणी पातळी वाढल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या आकडेवारीने पुढे आले आहे.
राज्य शासनाने २०१४ पासून शाश्वत सिंचन आणि शाश्वत शेती यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जलसंधारण, जलसंपदा, वनविभाग, कृषी विभाग, मनरेगा, भूजल सर्वेक्षण विभाग आदी सर्व विभागांनी जलयुक्त शिवार अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे.
यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढली असून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वेगवेगळ्या स्तरावर तयार होत आहे. यामुळे संरक्षित सिंचन क्षमतादेखील वाढत असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधराही तालुक्यात मागील तीन वर्षात झालेल्या कामांनी आता दृश्य स्वरूपात साठवण क्षमतेत वाढ होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.
राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे अभियान चालू केले. यामुळे अंदाजे एका शेततळ्यात एक ते दीड हेक्टर सिंचन करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन प्रकल्प गेल्या २०-२२ वर्षांपासून बंद पडलेले होते. ते सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेदेखील सिंचनात वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१७ आणि सप्टेंबर २०१८ या वर्षात तालुकानिहाय भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास जवळपास भूगर्भातील पाणी पातळीमध्ये एक ते सव्वा मीटरपर्यंत वाढ झाली आहे. २०१७ च्या सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षी जिल्ह्याची सरासरी भूगर्भपातळी उणे १.५० मीटर होती. यावर्षी ही सरासरी उणे ०.२९ मीटर आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे यांनी ही माहिती दिली आहे.