पाण्याची मोबाईल तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:21 PM2018-03-03T23:21:46+5:302018-03-03T23:21:46+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल अॅपद्वारे पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण व सार्वजनिक वापराचे पाणी नमुने गोळा करण्याची मोहीम जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे १ मार्च ते ३१ मे २०१८ या कालावधीत राबविली जात आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल अॅपद्वारे पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण व सार्वजनिक वापराचे पाणी नमुने गोळा करण्याची मोहीम जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे १ मार्च ते ३१ मे २०१८ या कालावधीत राबविली जात आहे. ही मोहीम जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची वर्षातून दोनवेळा रासायनिक व जैविक तपासणी ही भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेकडील प्रयोगशाळेत केली जात असते. महाराष्ट्र रिमोट सेन्सींग अप्लीकेशन सेंटर नागपूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे अक्षांश आणि रेखांश व त्यांची ठिकाणे यांची अचुक माहिती मोबाईल अप्लीकेशनद्वारे घेण्यात आली आहे. १ मार्च २०१८ ते ३१ मे २०१८ दरम्यान जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे पाणी नमुने ग्रामसेवक, जलसुरक्षक, बीआरसी, पाणी गुणवत्ता सल्लागार यांच्या मदतीने गोळा करण्यात येणार आहेत. यात पाणी पुरवठा योजना, हातपंप, नळ योजना यांचा समावेश आहे. अशा एकूण १४ हजार ९९४ स्त्रोतांबद्दलची माहिती गोळा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींतर्गत कार्यरत असणाºया जल सुरक्षकांना मोबाईल अॅप हाताळणीचे तालुका स्तरावर प्रशिक्षण पाणी गुणवत्ता तज्ज्ञ अंजली डाहुले यांनी दिले आहे.
अशी आहे प्रक्रिया
या मोबाईल अॅपमध्ये सर्व गावातील पाणी स्त्रोतांची अद्यावत माहिती आहे. या अप्लीकेशनचा वापर करतेवेळी जीपीएस सुरू केल्यानंतर स्त्रोतांच्या १०० मीटर अंतरामध्ये गेल्यानंतर त्याचा रंग बदलत जातो व त्यानंतर विस्तार अधिकारी, जलसुरक्षक, बीआरसी, उपविभागीय पाणी गुणवत्ता तज्ज्ञ किंवा अन्य अधिकारी व कर्मचारी यांना त्या स्त्रोतांचा फोटो काढून अपलोड करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी सोईस्कर व अद्यावत होणार आहे.
साथीच्या रोगांवर बसणार आळा
ग्रामीण भागातील सर्व स्त्रोतांची माहिती अद्यावत असल्यामुळे सर्व स्त्रोतांची वेळीच तपासणी करून व त्याची माहिती प्रयोगशाळेमार्फत तात्काळ आॅनलाईन केली जाईल. दूषित आढळलेल्या स्त्रोतांवर वेळीच उपाययोजना करून साथीच्या उद्रेकास आळा बसेल.
तालुकानिहाय पाण्याचे विविध स्रोत
बल्लारपूर-४२५, भद्रावती-४६४, ब्रह्मपुरी-१२९७, चंद्रपूर-८९३, चिमूर-१८९७, गोंडपिपरी-७२८, जिवती-४४०, कोरपना-७०८, मूल-११७४, नागभीड-१६१७, पोंभूर्णा-६८५, राजुरा-७७९, सावली-१४१४, सिंदेवाही-१२६०, वरोरा-१२१५ असे तालुकानिहाय पाणी स्रोत असून सर्वांचीच तपासणी करण्यात येणार आहे.