दोन दिवसांत एकदा पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:28 PM2018-02-23T23:28:45+5:302018-02-23T23:28:45+5:30

चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.

Water once in two days! | दोन दिवसांत एकदा पाणी!

दोन दिवसांत एकदा पाणी!

Next
ठळक मुद्दे१ मार्चपासून अंमलबजावणी : पाणीटंचाईमुळे महापालिकेचा निर्णय

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.
सध्या इरई धरणात केवळ २३ क्युबिक मीटर जलसाठा आहे. यातील ४.८० क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राकडून वीज निर्मितीसाठी घेतले जाते. एक क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लागते. तर दोन क्युबिक मीटर पाणी केवळ बाष्पिभवनामुळे कमी होते. त्यामुळे सध्या धरणात अस्तित्वात असलेले पाणी पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत टिकविणे व नागरिकांना देणे मनपापुढे आव्हान आहे. यासाठी मनपाने पाणी टंचाई आराखडा तयार केला असून त्यात अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त काकडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वास्तविक फेब्रुवारी महिन्यातच एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार होता. मात्र अस्तित्वात असलेले पाणी बघता हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र आता बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मनपाला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागल्याचेही आयुक्त काकडे म्हणाले.१ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवसातून आता एकदाच नळाद्वारे पाणी मिळू शकणार आहे.
इरई नदी व धरणात मातीचा बंधारा
संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून इरई धरण येथे विहिरीसभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. याशिवाय दाताळा येथील इरई नदीवरही एक बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्याचे काम सुरूही झाले आहे, अशी माहितीही काकडे यांनी दिली.
विहिरी केल्या स्वच्छ
पाणी टंचाई काळात विहिरीतून नागरिकांना शुध्द पाणी घेता यावे, यासाठी शहरातील विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यातील ३९ विहिरींबाबत अहवाल आला असून या विहिरीत पाणी पिण्यायोग्य आहे. त्यामुळे या विहिरी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आणखी ६५ विहिरींचा अहवाल आल्यानंतर त्या विहिरीत पाणीही नागरिकांना उपयोग पडणार आहे. याशिवाय शहरातील चार मोठ्या विहिरींवर हातपंप बसवून पाणी पुरवठा केला जाणार आहे.
४५४ हातपंप उपलब्ध
शहरातील हातपंपांचीही मनपाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत शहरातील २०० हातपंप बंद असून ते सुरू होण्याची शक्यताही नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उर्वरित ४५४ हातपंप सुरू करण्यात आले असून या हातपंपांची दररोज तपासणी केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसात या हातपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नळाच्या वेळात भारनियमन
नळाद्वारे पाणी पुरवठा होताना अनेकजण मोटरपंप लावून पाण्याचा उपसा करतात. त्यामुळे मोटरपंप जप्तीची मोहीम मनपाद्वारे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नळ येण्याच्या वेळात भारनियमन करण्यात यावे, यासाठी महावितरणला विनंती करण्यात आली आहे. भारनियमन असल्याने कुणीही मोटरपंप लावणार नाही, हा त्यामागील उद्देश असणार आहे.
नवीन कनेक्शन नाही
इरई धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत शहरात कुणालाही नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार नसल्याचे मनपा आयुक्त काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय नवीन बांधकामालादेखील परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Water once in two days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.