पाण्यासाठी भिसीत उद्रेक ग्रामपंचायतवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:51 PM2019-04-15T22:51:56+5:302019-04-15T22:52:23+5:30

येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

Water outbreak at Bhasit Gram Panchayat attack | पाण्यासाठी भिसीत उद्रेक ग्रामपंचायतवर हल्लाबोल

पाण्यासाठी भिसीत उद्रेक ग्रामपंचायतवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देएकमेकांना मारहाण : मडके फोडून ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क
भिसी : येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात उपस्थित सरपंच, उपसरपंच, कर्मचाऱ्यांसमोरच घरून आणलेले मडके, रांजन फोडून आपला आक्रोश व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या दारावर चपलांचा हार टाकून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
भिसी येथे ३६५ दिवसांतून केवळ ८० दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नळयोजनेचा कर दुप्पट झाला तरी सलग १६ दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. नेहमी ४ ते ५ दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पण यावेळी १६ दिवस पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर तुटून पडले.
यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती पोलिसांना होताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक झामरे यांनी ग्रामपंचायत परिसरात पोलीस बंदोबस्त लावला होता.

साहित्याची नासधूस
महिलांनी सरपंच योगिता गोहणे यांना कार्यालयातच घेराव घातला व प्रश्नांचा भडिमार सुरू केला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी कार्यालयातील खुर्च्या, काचेचे ग्लास व इतर साहित्याची तोडफोड केली. काही महिला व युवकांनी घरून पाण्याचे मडके व रांजन आणले होते. ते तिथेच फोडून संताप व्यक्त केला.
परस्परांविरुद्ध मारहाणीची तक्रार
यावेळी मालूबाई श्रावण काळे व इतर महिलांनी सरपंच गोहणे यांना टँकरने पाणी द्या, नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करा, जमत नसेल तर राजीनामा द्या, असा प्रश्नांचा भडिमार केला. यावरून गोहणे यांचा पारा भडकला व त्यांनी मालूबाई काळे यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे उपस्थित जनता अधिकच भडकली. मालूबाई काळेला सोबत घेऊन जनतेने मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. मालू काळे यांनी पोलिसात सरपंच गोहणे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याचवेळी गोहणे यांनी मालू काळे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविला.
ग्राम विकास अधिकाऱ्यांनाही घेराव
सकाळी १०.३० वाजता भिसीचे ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द शेंडे ग्रामपंचायतीत आले. दाराला कुलूप व चपलांचा हार बघून ते भांबावले. लगेच नागरिकांनी त्यांनाही घेरले व पाणीप्रश्नावरून जाब विचारला. निवडणुकीच्या कामासाठी आठ दिवस शेंडे बाहेर होते. भिसीत पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. पण अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेंडे म्हणाले की, दोन महिन्यांपासून मी बीडीओकडे जनरेटर खरेदी करण्याचा लेखी प्रस्ताव दिला आहे. पण चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमणे व बिडीओ जाधव यांनी सदर प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रयत्न करूनही मला भिसीचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही.

Web Title: Water outbreak at Bhasit Gram Panchayat attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.