टरबूज शेतीमुळे उद्भवणार पाणी समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:03 PM2018-01-09T23:03:50+5:302018-01-09T23:04:10+5:30
तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख देवाडा खुर्द गावाची ओळख आहे.
आॅनलाईन लोकमत
पोंभुर्णा : तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख देवाडा खुर्द गावाची ओळख आहे. या गावालगतच्या अंधारी नदी पात्रालगत परप्रांतीय व्यक्तींनी टरबूज शेतीची लागवड केली आहे. नदी पात्रातील पाणी टरबुज शेतीला दिले जात असल्याने गावकºयांना पिण्याच्या पाणी समस्येला सामोरे जावे लागण्याची पाळी आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावामध्ये पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने या गावात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्येच पाण्याची टंचाई भासत असते. गावातील अनेक विहिरी पाण्याविना कोरड्या पडतात. येथील हातपंप सुद्धा बंद पडतात. त्यामुळे स्थानिक नागरिक बैलबंडीद्वारे शेतशिवारातील विहिरीतील पाणी आणून आपली समस्या सोडवितात.
गावामध्ये पाण्याची टाकी असून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अंधारी नदीच्या पात्रातून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जोपर्यंत नदीच्या पात्रात पाणी असते, तोपर्यंत नळाद्वारे पाणी दिले जाते. नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत दरवर्षी सिमेंटच्या खाली बॅगमध्ये रेती भरुन बंधारा बांधण्यात येतो. त्यामुळे काही प्रमाणात गावाला पाण्याची सोय होते. परंतु, मागील वर्षीपासून देवाडा खुर्द येथील ग्रामपंचायतीची कुठलीही परवाणगी न घेता परप्रांतीय व्यक्तींनी अंधारी नदीच्या काठावर असलेल्या १०० एकरच्यावर शेतीमध्ये टरबूज शेतीची लागवड करीत आहेत. या शेतीला अंधारी नदीच्या पात्रातील पाणी दिले जात आहे. परंतु सद्यास्थितीत नदीच्या पात्रातील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे संबंधीत टरबूज शेतीधारक आणि बागायत शेतीधारक त्या ठिकाणावरुन नेहमी पाण्याचा वापर करीत राहिल्यास देवाडा खुर्द वासीयांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरपास्त होणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. देवाडा खुर्द येथे दरवर्षी पाण्याची भीषण समस्या असताना सुद्धा या परप्रांतीय टरबूज शेती व्यवसायीकांनी पाणी करण्याची परवानगी आणि विद्युत पुरवठ्याची परवानगी कुणी दिली, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन स्थानिक नागरिकांना भविष्यात पाणी विषयक समस्या जाणवणार नाही यासाठी ठोस पर्यायी योजना त्वरीत उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन या तांत्रीक युगात दरवर्षी नदीवर बंधारा बांधण्याची पाळी येणार नाही, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याची मागणी
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द हे गाव सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख असून सदर गाव पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील आहे. पालकमंत्र्यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये एटीएमद्वारे शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु देवाडा खुर्द या गावात गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिक अंधारी नदीच्या पात्रातील अशुद्ध असे गढूळ पाणी पितात. नदीच्या पात्रातील पाणी संपले तर शेतशिवारातील विहिरीतील, तलावातील पाणी पितात. त्यांना शुद्ध पाणी तर सोडा अशुद्ध व गढूळ पाणी शुद्ध उन्हाळ्यामध्ये मिळत नाही. दरवर्षी नदी पात्रामध्ये बंधारा बांधून त्यात अडविलेल्या पाण्यावर आपली तहाण भागवावी लागत असते. तेच पाणी उन्हाळ्याच्या दिवसात अनेक जनावरे पितात, म्हशी पाण्यात बसतात. त्यांचा मलमत्रु तिथे साचतो. अंत्यविधीही तिथेच केली जाते. तरीही तेच पाणी गावात पुरवठा केला जात असल्याने हेच पाणी गावकरी पितात, असे विदारक चित्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा सर्व प्रकार संबंधीत अधिकारी व लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यानी जाता येता बघतात. परंतु, यावर कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे गावकºयांत रोष असून गावकºयांना शुद्ध पाणी देण्याची मागणी होत आहे.