लिकेज पाईपलाईनमुळे पाण्याचा प्रश्न
By admin | Published: January 10, 2015 01:06 AM2015-01-10T01:06:33+5:302015-01-10T01:06:33+5:30
चंद्रपूर शहराच्या अगदी टोकावर असलेले पठाणपुरा प्रभाग म्हणजे शहरातील अतिशय जुनी वस्ती. असे असले तरी पठाणपुरा प्रभागातील पूर्ण समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत.
रवी जवळे चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या अगदी टोकावर असलेले पठाणपुरा प्रभाग म्हणजे शहरातील अतिशय जुनी वस्ती. असे असले तरी पठाणपुरा प्रभागातील पूर्ण समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. नागरिकांची बोंब कायम आहे. प्रभागात काही प्रमाणात रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम झाले असले तरी अनेक भागात रस्ते, नाल्यांची समस्या गंभीर आहे. या प्रभागात पाण्याचीही मोठी समस्या आहे. लिकेज पाईपलाईन अनेक ठिकाणी चोकअप झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाण्याचा पुरवठा होत नाही.
शहराचे ह्दयस्थान असलेल्या गांधी चौकाच्या थोड्या पुढे गेले की पठाणपुरा प्रभागाची हद्द सुरू होते. या प्रभागात बऱ्यापैकी लोकवस्ती आहे. सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या या प्रभागाचा परिसरही मोठा आहे. लोकमत चमूने आज शुक्रवारी पठाणपुरा प्रभागाचा फेरफटका मारला असता अनेक समस्या दिसून आल्या. विठ्ठल मंदिर प्रभाग व पठाणपुरा प्रभागाच्या मधोमध एक रस्ता आहे. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील हा रस्ता ग्रामीण भागातील रस्त्यापेक्षा केविलवाणा आहे. दोन प्रभागापैकी एकही नगरसेवक याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
जोडदेऊळ वॉर्डातील पठाणपुरा गेटकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. हा रस्ता मंजूर झाल्याचे वारंवार सांगण्यात येते. मात्र अजूनही रस्त्याच्या कामाला हातही लावण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, या जोडदेऊळ वॉर्डात नळाला पाणीही येत नाही. येथील पाईप लाईन चोकअप झाल्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून सांगितले जाते. मात्र पाईपलाईन दुरुस्त केली जात नाही. येथून पठाणपुरा गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते, असे येथील नागरिकांनी सांगितले.
येथील मिलिंदनगर नावाच्या दलित वस्तीतही अनेक समस्या आढळून आल्या. या नगरात कचराकुंड्या नाहीत. त्यामुळे मोकळ्या जागाच कचराकुंड्या झाल्या आहेत. अनेक मोकळ्या जागेवर कचऱ्याचे ढिग लोकमतच्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे, या ठिकाणी नाल्याचे बांधकाम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र नाल्यांना स्लोपच नसल्याने या नाल्यांमधून पाणीच वाहत नाही. यातील काही नाल्या अल्पावधीतच खचलेल्याही आढळून आल्या.
याबाबत येथील नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रारही केली. मात्र कुणीच लक्ष दिले नाही. मिलिंद नगरादेखील पाण्याचा प्रश्न आहे. येथे नळ असले तरी नळातून केवळ दोनचार गुंड पाणी येते. उर्वरित कामे हातपंपाच्या माध्यमातून करावे लागतात. या नगरातील रस्तेही निमुळते आहेत. एखाद्याच्या घरी लग्न समारंभ असला की एसटी महामंडळाची बसदेखील जात नाही. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे झाले आहे.
पठाणपुरा प्रभागातील काळाराम मंदिराच्या समोरचा परिसर किसान वसाहत म्हणून ओळखला जातो. या वसाहतीत अनेकांच्या घरी शौचालय नाही. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे. मात्र त्याची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की कुणीही शौचालयाच्या आत शौचास बसत नाही. शौचालयाच्या समोरच हा विधी आटोपला जातो. त्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरून रोगराईचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या शौचालयात पाण्याची व्यवस्था नाही. तरीही नागरिक नाईलाजाने याच शौचालयाचा वापर करतात. पाणी नागरिक आपल्या घरातून घेऊन जातात. या ठिकाणी नवीन शौचालयाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांची आहे.