६० हजार हेक्टर क्षेत्रात जलसमृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:10 IST2019-08-13T00:09:20+5:302019-08-13T00:10:44+5:30
शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.

६० हजार हेक्टर क्षेत्रात जलसमृद्धी
राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले आहे.
आसोलामेंढा प्रकल्प सावली तालुक्यातील पाथरी गावाजवळ ब्रिटीशकालीन पूर्ण झालेला प्रकल्प आहे. गोसीखुर्द धरण पूर्ण झाल्यानंतर वैनगंगा नदीतील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावर ११ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात सााठविता येते. त्यासाठी तलावाची उंची २.७० मीटरने वाढवून आसोलामेंढा कालव्याची वहन क्षमता १.७ क्युमेक्स करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणामुळे ५४ हजार ८७९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाची सिंचन क्षमता जुलै २०१९ पर्यंत १५ हजार ९७९ हेक्टर आहे. आसोलामेंढा धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये ११ गावे येतात. बुडीत गावांचे पुनर्वसन केल्या जाणार आहे. यासाठी १४.३३ हेक्टर आर. जागा ताब्यात घेण्यात आली.
असे होईल विस्तारीकरण
आसोलामेंढा प्रकल्पाचा मुख्य कालवा ४१.३७ किमी लांबीचा आहे. त्यामध्ये ३ शाखा कालवे, २० वितरीका, ४२ लघु कालवे व २१ थेट विमोचके असणार आहे. आसोलामेंढा प्रकल्पाच्या नुतनीकरणाचे काम असल्याने वाढीव क्षेत्राकरिता नुतनीकरण केले जात आहे. सन २०१९-२० या वर्षात पूर्ण लाभक्षेत्राची सिंचन क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे काम सुरू आहे. पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उजव्या तिरावरील ९९ किमी लांबीच्या कालव्यातून आसोलामेंढा तलावात साठविल्या जाईल. याकरिता तलावाची उंची २.७० मीटरने वाढणार आहे. परिणामी, आसालोमेंढा प्रकल्पामुळे ८२ गावांत जलसमृद्धी येणार आहे.