पाणी टंचाईचा कृती आराखडा कागदावरच
By admin | Published: June 3, 2014 11:58 PM2014-06-03T23:58:11+5:302014-06-03T23:58:11+5:30
कोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला.
अशोककुमार भगत - कोरपना
कोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला. या गावांसाठी उपाययोजना कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या असल्या, तरी ही कामे प्रत्यक्षात केव्हा सुरू होतील, असा प्रश्न त्रस्त नागरिकांना पडला आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजनांची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील पं.स. च्या कृती आराखड्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे.
सध्या तालुक्यातील विरुर (गाडे), पारडी, गाडेगाव, उपरवाही, गडचांदूर, लखमापूर, नारंडा, पिपरी, धानोली, खैरगाव, पांडवगुडा, इरई, बोरगाव, खैरगाव, अंतरगाव, सांगोडा, परसोडा, बाखर्डी, कवठाळा, भोयगाव, भारोसासह सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आणि कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि नदी, नाले, तलाव कोरडे पडू लागल्याने पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. तालुक्यात अंमलनाला व पकडीगुड्डम हे दोन जलाशय असून नारंडा आणि नांदगाव (सूर्य) येथे गावतलाव आहेत. तेथील जलस्तर खालावला आहे. तालुक्याच्या सिमेवरुन वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्या प्रवाहीत होत असल्या तरी नदी काठावरील सुमारे १६ गावे तहानलेलीच आहेत. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई अशा दुहेरी कात्रीत ही गावे अडकली आहेत.
सुमारे ३५ हजार लोकवस्तीच्या गडचांदूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सदोष वितरण पद्धतीमुळे रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वॉर्डात नळांना पाणी येत नसल्यामुळे हातपंपावर रांगा लावून पाणी भरण्याची कसरत करावी लागत आहे. नाल्याच्या जुन्या विहिरीतील पाणी जलकुंभात साठवल्यानंतर त्याचे वितरण जलवाहिन्यांच्या माध्यमातून गावात केले जाते. ३0 वर्षे जुन्या असलेल्या या जलवाहिन्या जिर्ण झाल्याने पाणी गळती वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गडचांदूरसाठी ११ कोटी ७६ लाखांची नळयोजना मंजूर करण्यात आली. दोन वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अपूर्णच आहे. वार्ड क्रमांक एकमध्ये जलशुद्धीकरण संयत्र उभारले असून जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या वॉर्डातील भीषण पाणी टंचाई बघता २६ एप्रिलपासून नजीकच्या गोपालपूर येथील खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले. गडचांदुरात तब्बल १८२ शासकीय हातपंप असून यांपैकी ५0 च्या वर पंपानी उन्हाळ्यापूर्वीच ‘हात’ टेकले. त्याची अद्यापही दुरुस्ती झाली नाही.
टंचाईग्रस्त भागातील पाणी योजना राबविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही पंचायत समितीद्वारा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने विरुर (गाडे), भोयगाव, कातलाबोडी, खैरगाव, कुकूडबोडी, धानोली, निमनी येथील नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली. ही कामे कासवगतीने सुरू आहेत. पारडी, उपरवाही, धानोली तांडा, गाडेगाव, पांडवगुडा येथील हातपंपाची कामे प्रस्तावित असली तरी या कामांना अद्यापही सुरुवातच झाली नाही. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन पाणी टंचाई व त्यावर केलेल्या नियोजनाचे केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात भीषण टंचाईच्या झळा मात्र जनसामान्यांना सोसाव्या लागत आहे.