बारसागड येथे पाणी टंचाई
By admin | Published: June 14, 2016 12:37 AM2016-06-14T00:37:50+5:302016-06-14T00:37:50+5:30
तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दीड महिन्यापासून तीन हातपंप बंद
सावली : तालुक्यातील बारसागड येथील तीन हातपंप मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बारसागड येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर हातपंप दुरुस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बारसागड येथील लोकसंख्या ३२५ च्या घरात आहे. येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाच्या योेजनेतून गावात हातपंप योजना राबविण्यात आली. मात्र येथील तीन हातपंप मागील दीड महिण्यापासून बंद स्थितीत आहेत. येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी १४ एप्रिल रोजी पंचायत समिती येथील नोंद रजिस्टरवर हातपंप दुरुस्तीची मागणी केली होती. सचिवांच्या उपस्थितीत बंद हातपंप दुरुस्तीबाबत ठराव पारित करण्यात आला. परंतु दीड महिण्याचा कालावधी लोटूनही हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली नाही. गावातील तीन हातपंप बंद असल्यामुळे नागरिक दोन विहिरीवरच आपली तहान भागवित आहेत.
मात्र, यापैकी एक विहीर मागील आठवड्यात कोरडी पडल्याने महिलांना गावाबाहेरील विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. सध्या गावात एकाच विहिरीवरुन पाणीपुरवठा होत आहे.
त्या विहिरीची पातळीसुद्धा खोलवर गेली आहे. त्यामुळे आता बारसागड येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसात पाऊस पडला नाही तर गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
त्यामुळे येत्या १५ दिवसात येथील हातपंप दुरुस्त न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही लोडे यांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)