पाणी टंचाईने कोरोनाचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:39+5:302021-05-22T04:26:39+5:30
सोमनपल्लीतील पाणी पुरवठा ठप्प : एकमेव विहिरीवर संपूर्ण गावाची गर्दी निलेश झाडे गोंडपिपरी : कोरोना हॉटस्पाट ठरलेल्या सोमनपल्लीत मागील ...
सोमनपल्लीतील पाणी पुरवठा ठप्प : एकमेव विहिरीवर संपूर्ण गावाची गर्दी
निलेश झाडे
गोंडपिपरी : कोरोना हॉटस्पाट ठरलेल्या सोमनपल्लीत मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. पाण्यासाठी विहिरीवर तोबा गर्दी उसळत असून यामुळे कोरोना बाधित वाढण्याची शक्यता बळावली आहे. गावकरी भयभीत झाले आहेत.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या सोमनपल्ली येथे धाबा पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मागील आठ दिवसांपासून तांत्रिक कारणाने गावातील पाणी पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिला विहिरीवर गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे, सोमनपल्ली गावात कोरोना बाधिंताचा आकडा मोठा आहे. आरोग्य विभागाचे तीन कॅम्प गावात बसविले होते. आरोग्य विभागाचा प्रयत्नाने गावातील कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला. मात्र आता पाणी भरण्यासाठी विहिरीवर गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. क्षुल्लक कारणाने वारंवार गावातील पाणी पुरवठा खंडित होत असतो. एकीकडे गावात भीषण पाणी टंचाई सूरू असतानाच गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.
बॉक्स
पाणी पूरवठा सुरळीत करा
गावात पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ऐन कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एकीकडे प्रशासन घराबाहेर पडू नका,असे सांगत लॉकडाऊन करीत आहे. आणि दुसरीकडे पाण्यासाठी भटकंती करायची वेळ नागरिकांवर आणत आहे. त्यामुळे गावातील पाणी पुरवठा पुर्वरत सूरू करण्याची मागणी सरपंच वैशाली म्हशाखेत्री, ग्रामपंचायत सदस्य परशुराम कुबडे यांनी केली आहे.
कोट
गावात कोरोना बाधितांचा आकडा वाढला होता. आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र पाणी पुरवठा ठप्प असल्याने विहिरीवर गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. प्रशासनाने त्वरित पाणी पुरवठा सूरू करावा.
-कवडू कुबडे,उपसरपंच सोमनपल्ली.