१५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:46 PM2024-05-08T15:46:34+5:302024-05-08T15:47:10+5:30
Chandrapur : पाण्यासाठी सुरु आहे पायपीट; विहिरींनी गाठला तळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड पंचायत समिती अंतर्गत १५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावातील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींचे पाणी तळाशी गेल्याने १५ गावातील नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच त्रेधा तिरपट उडत असल्याची माहिती आहे.
उन्हाळा आता ऐन भरात आहे. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक पाणी स्त्रोतावर महिलांची गर्दी वाढली आहे. परिणामी विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळयोजनेच्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने तर काही ठिकाणी जल जीवन मिशनद्वारा सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.
पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार पांजरेपार येथील नळयोजना बंद पडल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पान्होळी येथील नळयोजनेच्या विहिरीत पाणी नसल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोर्धा, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, ढोरपा, चारगाव चक, मोहाळी, मिंथूर, कसर्ला येथील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठल्याने या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कन्हाळगाव व बोंड येथे नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने या दोन गावात पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. कसर्ला येथील पाणीटंचाईस जल जीवन मिशनचे काम अपूर्ण हेही कारण सांगितल्या जात आहे.
सुचविण्यात आलेल्या उपाययोजना
या गावात पाणी टंचाईच्या समस्येचे त्वरित निवारण करण्यासाठी गावातील विहिरींचे गाळ काढणे, जुन्या विंधन विहिरी फ्लशिंग करणे, गावात नवीन विंधन विहिरी खोदणे, इन्व्हेल बोअर मारणे आदी उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. मात्र या उपाययोजनांची पूर्तता केव्हा करण्यात येते या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. यासंदर्भात येथील प्रभारी गटविकास अधिकारी शुक्रे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, पण त्यांचेकडून प्रतिसाद मिळाला नाही.