नागभीडच्या मानी मोहल्ल्यात पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:02+5:302021-03-10T04:29:02+5:30
नागभीड - ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गालगतच शहराच्या मध्यभागी हा मोहल्ला वसला आहे. जवळपास अडीचशे तीनशे घरांची लोकवस्ती या मोहल्ल्यात आहे. ...
नागभीड - ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गालगतच शहराच्या मध्यभागी हा मोहल्ला वसला आहे. जवळपास अडीचशे तीनशे घरांची लोकवस्ती या मोहल्ल्यात आहे. शेतीशी संबंधित काम करणाऱ्यांची लोकसंख्या या मोहल्ल्यात अधिक आहे. सुविधा म्हणून अनेकांनी घरी नगर परिषदेकडून नळ जोडणी घेतली आहेत.
सकाळी या मोहल्ल्यात नळाला पाणी येत असले तरी फक्त ५ ते १० मिनिटांत नळाला येणारे पाणी बंद होते. नंतर थेंब थेंब पाणी सुरू असते. त्यामुळे मोहल्ल्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही अशी माहिती या मोहल्ल्यातील अमोल वानखेडे या युवकाने 'लोकमत'शी बोलतांना दिली. मोहल्ल्यात पिण्याच्या पाण्याचे अन्य कोणतेही स्त्रोत्र नसल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण होत असल्याची माहिती आहे. येथील नागरिक मग रात्रीच्या वेळी किंवा सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील तपाळ योजनेच्या मुख्य पाईप लाईनवरील व्हाॅल्व्हवर लावण्यात आलेल्या नळजोडणीवरून पाणी भरून आपली गरज पूर्ण असतात. मोहल्ल्यात वास्तव्यास असणारा वर्ग कामकरी वर्गातील आहे. त्यांना अगदी सकाळी घरची कामे आटोपून शेतीच्या व अन्य कामांवर जावे लागते. पण त्यांना वेळेवर पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.