उन्हाळ्यापूर्वीच चंद्रपुरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:27 PM2019-02-17T22:27:21+5:302019-02-17T22:27:35+5:30
उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
मागील वर्षी चंद्रपुरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांपासून नदी, नाले आटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यांपासूनच टंचाईचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर शहराला गुरुकपा असोसिएटमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही कंपनी अनेक भागांत सुरळीत पाणीपुरवठा करीत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून पठाणपुरा, बालाजी वार्ड, गोपालपुरी अनियमित पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
या परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्याकरिता पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. ते आता पूर्ण झाली. मात्र, ती शोभेची बनली आहे. पाणीच मिळत नसल्याने टाकीचे काम केले तरी कशाला, असा सवाल या भागातील नगारिकांनी उपस्थित केला आहे. सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असे इशारा सामाजिक कार्यकर्ते अनुप चिवंडे यांनी दिला आहे.