हातपंप बंद पडल्याने पाटण परिसरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:48 AM2020-03-01T00:48:57+5:302020-03-01T00:49:26+5:30
महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.
अनवर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : जिवती तालुक्यातील कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा या गावांतील हातपंप नादुरूस्त असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. संगमनापूर गावाला भेट दिली असता नागरिकांचे हाल दिसून आले. भीमराव मुट्टेलु, चिंनू राजू, मारोती भिमराव मुटटेलु, भीमराव बुततेलु, बापूराव भित्तेलु, महेश मुट्टेलु, मैसु मुट्टेलु, येल्ला, किसन, संतोष, देवराव राजू मुट्टेलु आदींनी गावातील जलसंकटाची माहिती दिली. सहा महिन्यांपासून हातपंप बंद असल्यामुळे हरी कुंडगिरी यांच्या खासगी विहिरीतून पाण्याची गरज भागवावी लागत असल्याचे पोलीस पाटील भीमराव मुहूलू यांनी सांगितले. परमडोली, कोठा, शंकरलोधी, लेंडीगुडा, महाराजगुडा, पद्मावती, आंतरगाव, इंदिरानगर, येसापूर, पळसगाव, नारायणगुडा, भोलापाठर, गौरी या वादग्रस्त गावांमध्येही टंचाईची चाहूल लागली आहे.
विकास योजना पोहोचवा
जिवती तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये विकासाच्या अनेक योजना पोहोचल्या नाही. शेतकरी आजही पारंपरिक शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत. महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाºया योजनांचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीच्या विकासासोबतच सामाजिक न्याय व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक झाले आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
महाराष्ट्रातील भाईपठार व कोलामगुडा येथील कुटुंबांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नापिकी व तेलंगणा सरकारच्या योजनांसाठी स्थलांतर केले. या गावांमध्येही पाणी टंचाईची चाहूल सुरू झाली. कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा येथील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.