वेकोलि परिसरातील गावांना बसणार उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईची झळ
By admin | Published: January 22, 2015 12:55 AM2015-01-22T00:55:36+5:302015-01-22T00:55:36+5:30
यावर्षी कमी पडलेला पाऊस आणि राजुरा तालुक्यात वाढत असलेल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे.
गोवरी : यावर्षी कमी पडलेला पाऊस आणि राजुरा तालुक्यात वाढत असलेल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जानेवारी महिन्यातच खासगी बोअरवेलला कमी पाणी येत असल्याने उन्हाळ्यापूर्वीच वेकोलि परिसरात पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस पडला. नदी, नाले, तलाव दिवाळीतच कोरडे पडल्याने पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरले नाही. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ न होता ती खालावत गेली. राजुरा तालुका हा कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या कोळसा खाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. वेकोलि परिसरातील गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, कळमना, मानोली, बाबापूर, माथरा, गोयेगाव, अंतरगाव या गावांना आता पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार असून परिसरातील शेती पाण्याअभावी प्रभावित झाली आहे.
वेकोलिच्या कोळसा खाणी खासगी बोअरवेलपेक्षा अधिक खोल असल्याने व बहुसंख्य गावातील नळयोजनेचा पाणी पुरवठा बोअरवेलच्या मोटरपंपावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करायला लावणारा ठरणार आहे. शेतातील कृषीपंपांना पाणीच येत नसल्याने शेतकऱ्यांचा रबी हंगाम धोक्यात आला आहे. उल्लेखनीय असे की यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम दुष्काळाच्या सावटात होता. शेतकऱ्यांना शेतातून अत्यल्प उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी घेतलेले कर्ज तर फेडू शकला नाहीच. शेतीसाठी लावलेला पैसाही काढू शकला नाही. आता कमी पाण्यामुळे रबी हंगामातही कमी उत्पादन होण्याची चिन्ह दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर आहे. आता पातळीच खालावल्याने पाण्याचीही चिंता आहेच. (वार्ताहर)